महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ जानेवारी । चीनने करोना रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी लपवल्याचा आरोप जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी केला आहे. यामुळे जगभरात होणाऱ्या करोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा स्पष्ट नसल्याचेही डब्लूएचओकडून सांगण्यात आले आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषद यांनी याबाबत माहिती दिली.
गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेकडे ११ हजार ५०० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी ४० टक्के रुग्ण अमेरिका, ३० टक्के रुग्ण युरोप आणि उर्वरित ३० टक्के रुग्ण पश्चिम पॅसिफिक प्रदेशातील आहे. तसेच चीनने करोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या कमी नोंदवल्याने जगभरात झालेल्या करोना रुग्णांच्या मृत्यूंचा आकडा स्पष्ट नाही, अशी माहिती टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना, टेड्रोस यांनी सर्वच देशांना करोना रुग्णांच्या मृत्यूची योग्य आकडेवारी जाहीर करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, करोनाच्या नवीन व्हेरिएंटविरोधात लढण्यासाठी सर्वच देशांनी करोना रुग्णांच्या मृत्यूची योग्य आकडेवारी सार्वजनिक करणे आवश्यक आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, ”करोनाच्या XBB.1.5 या नवीन व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी सिक्वेन्सिंग ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. आम्ही सर्वच देशांना सिक्वेन्सिंग वाढवण्याचे आवाहन केले आहे. यामुळे करोना रुग्णांची अचूक माहिती पुढे येणास मदत होईल.”
दरम्यान, गेल्या डिसेंबर महिन्यात चीनने करोना निर्बंध शिथील केले होते. मात्र, त्यानंतर जानेवारी महिन्यात चीनमध्ये पुन्हा करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. यापार्श्वभूमीवर चीनमध्ये पुन्हा विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली.