महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ जानेवारी । महाराष्ट्रातली प्रत्येक आई ज्यांच्या प्रेरणेने आपल्या मुलांवर संस्कार करते अशा जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव येथील म्हाळसाबाई आणि लखुजी जाधव यांच्या पोटी झाला.लखोजीराजे जाधव हे मराठा कुलीन होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. लखुजीराजांना चार मुलं होते पण लखुजीराजे आणि म्हाळसा बाईंना मुलीची आस होती त्यांनी रेणुका मातेला मुलगी व्हावी म्हणून नवस केलेला आणि अर्थात तो फळास आला.
जिजाऊंचा जन्म ज्या काळात झाला, तो काळ पारतंत्र्याचा होता. अशा वातावरणात स्त्रियांनाच काय, पुरुषांनाही शिक्षण दिले जात नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीच्या वातावरणात जिजाऊंना युद्धकलेचे, साक्षरतेचे धडे लखुजीराजे यांनी दिले होते. जिजाऊसाहेब घोड्यावर बसण्यात तर अगदी पटाईत होत्या. त्यांनी मुघल सैन्य पाठीवर असताना घोड्यावर बसून शत्रूला चकवा दिल्याचे अनेक दाखले इतिहासात प्रसिद्ध आहेत. जिजाऊसाहेब तलवार चालविणे, भालाफेक, धनुष्यबाण चालविणे इत्यादी प्रशिक्षणात तरबेज होत्या. जिजाबाईंचा विवाह लहान वयातच वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी झाला. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान योद्धा म्हणून उभे केले.
भुईकोट राजवाडा
आज सिंधखेडच हे स्थळ केवळ ऐतिहासिक स्थळ नाही तर एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखले जाते. जिजाऊंचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये झालेला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर हायवेला लागुनच आहे. याच वास्तूसमोर नगर पालिकेने एक बगिचा देखील तयार केला आहे. इथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे. ही भव्य वास्तू भारतातील संपूर्ण हिंदुराज्यांच्या समाधीपेक्षा मोठी वास्तू आहे. ज्या ठिकाणी जिजाऊ खेळल्या तो रंगमहाल. याच महालात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची बोलणी केली होती.