महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ जानेवारी । मुंबईसह महाराष्ट्रात काही दिवसांपासून तापमानाचा पारा खाली उतरत असून गारठा वाढला आहे. मुंबईत रविवारी पहाटे तापमानाचा पारा १३.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. थंड वाऱ्यामुळं बोचऱ्या थंडीची जाणीव हळहळू होऊ लागली आहे. अजून दोन दिवस मुंबईकरांना थंडीचा कडाका सहन करावा लागणार आहे.
उत्तरेतील बर्फवृष्टी, उत्तर आणि वायव्य दिशेदरम्यान येणारे वारे याच्या परिणामामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही केंद्रांवर परिणाम झाला आहे. तर, राजस्थानमध्ये शीतलहर असल्याने त्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्रावर होत आहे. त्यामुळं राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा जोर वाढणार आहे.
१८ जानेवारीपर्यंत कोकणातील चार जिल्हे तसेच उत्तर महाराष्ट्रात आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या काही भागात थंडीचा प्रभाव अधिक वाढण्याचा अंदाज आहे. राज्यामध्ये उर्वरित ठिकाणी सध्या थंडीचा प्रभाव अधिक नाही. मध्य भारतात प्रभावित असलेल्या उच्च दाबाच्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांच्या परीघ क्षेत्र महाराष्ट्रात दक्षिणेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंडीला काहीसा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागात थंडीची तीव्रता फारशी वाढलेली नाही, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान १७ ते २० जानेवारी या कालावधीत राज्यातील काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.