महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १८ जानेवारी । जागतिक अर्थव्यवस्थेत भारत-चीन (India-China) कायम स्पर्धक आहेत. या दोन्ही देशात अनेक क्षेत्रात तीव्र स्पर्धा आहे. स्वस्त उत्पादनात चीन भारताच्या अनेक पटीने पुढे आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने आता पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. कोरोनाची चाल उलटल्याने चीनची अवस्था बिकट आहे. त्यामुळे अनेक कंपन्या भारत, मलेशिया, सिंगापूरकडे मोर्चा वळवत आहे. अशातच अनेक तज्ज्ञ भारताकडे आशेने पाहत आहेत. चीनची जागा लवकरच भारत घेईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विश्व आर्थिक मंचावर (World Economic Forum) भारताचा डंका आहे. या मंचावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) पूर्व गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी या विषयीवर स्पष्ट मत मांडले.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारताच्या आर्थिक वृद्धीबाबत मंगळवारी रघुराम राजन यांनी त्यांची स्पष्ट मते मांडली. राजन हे स्पष्ट वक्ते म्हणून सर्वपरिचीत आहेत. भारत लागलीच चीनची जागा घेईल, असे सध्यस्थिती म्हणणे घाईगडबडीचे होईल. पण पुढे ही परिस्थिती बदलेल, असे राजन यांनी स्पष्ट केले.
रघुराम राजन यांनी चीनच्या अर्थव्यवस्थेत काहीशी सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली. त्याचा चीनला फायदा होईल. जागतिक अर्थव्यवस्थेचा त्यामुळे बदल पहायला मिळतील. तसेच जागतिक अर्थव्यवस्था मजबूत होईल. सध्या अजून 12 महिन्यांचा अवकाश आहे. या काळात चीनने सुधारणा केल्या तर चीनची अर्थव्यवस्था चांगली वृद्धी करु शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
चीन सध्या कोविडच्या आणखी एका लाटेचा सामना करत आहे. तरीही चीनच्या अर्थव्यवस्थेत मार्च-एप्रिल दरम्यान आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल. उत्पादन क्षेत्रात चीनने पुन्हा झेप घेतली तर जगातील अनेक देशातील वस्तूंच्या किंमतीत पूर्ववत होतील वा स्वस्त होतील, असा राजन यांचा अंदाज आहे.
राजन यांच्या दाव्यानुसार, चीनची अर्थव्यवस्था सुधारली तर जागतिक समुदायाला त्याचा मोठा फायदा होईल. जगातील अनेक देशात महागाई कमी होईल, असे स्पष्ट संकेत रघुराम राजन यांनी दिले. चीनमधील उत्पादनावर परिणाम झाल्यानेच जागतिक महागाईत भर पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.