महाराष्ट्रात अंड्यांचा तुटवडा ! गरज भागवण्यासाठी कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडूवर अवलंबून

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ जानेवारी । हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अंडी महाग होतात, अशी चर्चा आपण नेहमीच ऐकतो. यंदा मात्र अंड्यांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अंडी महाग झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. महाराष्ट्रात दिवसाला तब्बल एक कोटी अंड्यांचा तुटवडा निर्माण झाल्याचं वृत्त इकोनॉमिक्स टाईम्सनं पीटीआयच्या हवाल्याने दिलं आहे. त्यामुळे राज्याला अंड्यांची गरज भागवण्यासाठी कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडूवर अवलंबून राहावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

या वृत्तानुसार, राज्यात दिवसाला एकूण २ कोटी २५ लाख अंड्यांची मागणी असून आजघडीला फक्त सव्वाकोटी अंडी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे एक कोटी अंड्यांचा तुटवडा राज्यायत निर्माण झाला आहे. सध्या रोजची अंड्यांची गरज भागवण्यासाठी कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू या शेजारी राज्यांकडून ही गरज भागवली जात आहे. मात्र, यासंदर्भात राज्यातच उपाय योजण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

“पशुसंवर्धन विभागाकडून यासाठी योजना तयार करण्यात आली असून त्यानुसार राज्यात ५० पांढऱ्या कोंबड्या २१ हजार रुपये इतक्या अनुदानित रकमेवर उपलब्ध करून देण्याचं नियोजन विभागाच्या विचाराधीन आहे. यासोबतच, राज्यात अंड्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला १००० पिंजरेही उपलब्ध करून देण्याचा समावेश या योजनेत आहे”, अशी माहिती विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी पीटीआयशी बोलताना दिल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

या योजनेसंदर्भातला प्रस्ताव पशुसंवर्धन विभागाकडून राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे. आजघडीला १०० अंड्यांचा दर ५७५ ते ६०० रुपयांच्या घरात असल्याचं दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यांत हे दर सातत्याने ५०० च्या वरच राहिल्याचंही दिसून आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *