केसगळती रोखण्यासाठी हे ज्यूस ठरतील गुणकारी, निर्जीव केसांची समस्याही होईल दूर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १९ जानेवारी । आपले केस घनदाट, चमकते, मऊ, मुलायम असावेत अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. पण प्रत्येक वेळेस ती पूर्ण होतेच असं नाही. आधुनिक काळात व्यस्त जीवनशैली, जंक फूड, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, धूळ , प्रदूषण आणि केसांची नीट निगा न राखणं यामुळे बऱ्याच महिलांना केसगळतीचा सामना करावा लागतो. केसांना पोषण न मिळाल्याने हा त्रास होतो. सतत होणाऱ्या केसगळतीमुळे जर तुम्हीसुद्धा त्रासला असाल तर आहारात काही हेल्दी ज्यूसचा समावेश करून पहा.

# आवळ्याचा ज्यूस – आवळ्याचा ज्यूस किंवा रस हा केसांसाठी अतिशय उत्तम ठरतो. त्यामुळे केस आणि स्काल्प दोघांची निगा राखली जाते. त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी हे नैसर्गिक अँटी-ऑक्सीडेंट असून ते फ्री-रॅडिकल्सशी लढा देते. आवळ्याचा रस प्यायल्याने पेशींचे नुकसान कमी होते. तसेच तुमच्या केसांची वाढ चांगली होऊ शकते. केसांना आतून मजबूत करण्यासाठी आवळ्याचा रस प्यावा.

# गाजराचा ज्यूस – गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई देखील भरपूर असतात, जे दोन्ही केसांच्या वाढीस उत्तेजन देतात. तसेच अकाली पांढऱ्या होणाऱ्या केसांची समस्या देखील टाळता येते. जर तुम्हाला दाट आणि लांब केस हवे असतील तर रोजच्या आहारात गाजराच्या रसाचा समावेश करा.

# काकडीचा ज्यूस – काकडीच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात, जे तुमच्या स्काल्पला हायड्रेशन आणि पोषण देतात. यामुळे केसांची चांगली वाढ होऊ शकते. तसेच, काकडीत असलेले व्हिटॅमिन ए हे सेबमच्या उत्पादनास प्रोत्साहन देऊ शकते. हे सेबम तुमच्या स्काल्पला जास्त काळ हायड्रेट ठेवते. यामुळे केसगळती आणि निर्जीव केसांची समस्या दूर होण्यास मदत होते.

# पालकाचा ज्यूस – पालकाचा ज्यूस हा तुमच्या केसांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. यामध्ये असलेले बरेच गुणधर्म शरीरापासून केसांपर्यंतच्या समस्या कमी करू शकतात. पालकामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट केस गळणे कमी करण्यास मदत करतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी आणि सी स्कॅल्प निरोगी ठेवण्यास मदत करते. तसेच, ते केसांमधील कोलेजनची पातळी वाढवू शकते. केसगळतीच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर पालकाचा रस रोज प्या.

# कोरफडीचा रस – कोरफडीचा रस हा पोटासाठी खूप चांगला मानला जातो. कोरफडीच्या ताज्या रसाचे नियमित सेवन केल्यास केस गळण्याच्या समस्येवर मात करता येते. चांगल्या परिणामांसाठी कोरफडीच्या रसात तुळशीची काही पाने, आवळा मिसळावा. त्यानंतर हा रस नीट मिक्स करून प्या. यामुळे केसांना भरपूर पोषण मिळू शकते.

टीप : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही उपचार करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *