प्रेरणादायी ; 1 वेळा जेवण आणि 14 तास अभ्यास, चप्पल शिवणाऱ्याची मुलगी झाली CA

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० जानेवारी । सनदी लेखापाल (सीए) सारख्या अत्‍यंत कठीण परीक्षेत यश मिळविणे तसे आव्‍हानात्‍मकच असते. अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे अभ्यास करूनही यशाची पायरी चढू शकत नाहीत. मात्र, घरची परिस्थिती नाजूक असताना देखील आपल्या जिद्दीला अभ्यासाची जोड देत अवघड समजल्या जाणाऱ्या सीए परीक्षेत कोमल इंगोलेने यश मिळवलं आहे. नुकताच लागलेल्या सीए परीक्षेच्या निकालात पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होण्याची तिने किमया केली आहे. कोमलच्या यशामुळे तिचं सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

वडील करतात चप्पल शिवण्याचे काम

मूळचे परभणी जिल्ह्यातील मांडाखळी गावचे मुंजाजी इंगोले. मुंजाजी यांचं दहावीपर्यंत शिक्षण झालं तर त्यांच्या पत्नी विजयमाला यांचं सहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं. पण पुढे परिस्थितीमुळे स्वतः शिक्षण घेऊ शकले नाही. यामुळे मुलांनी शिकून मोठे व्हावं यासाठी त्यांनी परभणी जिल्ह्यातून औरंगाबादमध्ये स्थायिक होण्याचे ठरवलं. विजयंतनगर सातारा परिसरामध्ये इंगोले कुटुंबीय राहू लागले. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी. मुंजाजी इंगोले यांचे दहावीनंतर आयटीआय झाल्यामुळे त्यांना एका कंपनीत नोकरी लागली. मात्र, कंपनी वाल्यांनी त्यांना नोकरीवरून कर्मचारी कपात हे कारण देत काढून टाकले. त्यामुळे त्यांनी परंपरागत व्यवसाय म्हणून चप्पल शिवायला सुरुवात केली. यासाठी छोटसं दुकान सुरू केलं. मात्र, एवढ्यावर घर चालत नसल्यामुळे त्यांची पत्नी देखील हातभार लागावा म्हणून इतरांच्या घरी स्वयंपाक करण्याचे काम करते.

विजयमाला यांना परिस्थितीमुळे शिकता आलं नाही. यामुळे स्वतःची मुलगी इंग्रजी शाळेत शिकावी अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे गावाकडून आल्यानंतर पहिली मध्ये प्रवेश घेण्यासाठी कोमल हिला इंग्रजी शाळेत घेऊन गेल्या. त्यावेळेस इंग्रजी शाळेत शिक्षकांनी सांगितलं की आम्ही फक्त उच्चशिक्षित पालकांच्या मुलांना प्रवेश देतो. यामुळे कोमलला त्या ठिकाणी प्रवेश मिळाला नाही आणि निराश हाताने विजयमाला कोमलला घेऊन घरी आल्या. त्यानंतर त्यांनी खाजगी शाळेत टाकले. कोमल लहानपणापासूनच हुशार होती. नववीमध्ये असताना कोमलला नवोदयच्या परीक्षेत यश मिळालं आणि ती नवोदय मध्ये शिक्षण घेऊ लागली. बारावीपर्यंत तिचे शिक्षण नवोदय मध्ये पूर्ण झाले. बारावीला 94 टक्के कोमलला मिळाले. कोमलचा नंबर मुंबई येथील एम एम कॉलेज येथे लागला.

 

सीए परीक्षा पास होण्यासाठी 14 तास केला अभ्यास

मी सीए परीक्षा पास होण्यासाठी 14 तास अभ्यास केला. यावेळेस एक वेळ जेवण मला मिळत होते. माझ्या आई-वडिलांनी आम्हाला शिकवण्यासाठी स्वतःच्या घराचे स्वप्न अपूर्ण ठेवत खिडक्यांना कपडा लावून आयुष्य काढले. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला शिकवल्यामुळे आई-वडिलांना आज स्वतःचं चांगलं घर नाहीये. त्यामुळे आता मी सीए झाल्यानंतर सगळ्यात पहिलं आई-वडिलांना हक्काचं घर तयार करून देणार आहे, असं कोमल इंगोले हिने सांगितले.

500 रुपयात महिना काढला

कोमल लहानपणापासूनच हुशार होती. तिला अभ्यासाशिवाय कुठलाच छंद नव्हता. तिने कधीच मोबाईल किंवा इतर गोष्टींसाठी हट्ट केला नाही. आमच्या मुलीने मुंबईसारख्या ठिकाणी 500 रुपयात महिना काढला आणि एक वेळचं जेवण करून अभ्यास केला. यामुळे ती आज सीए झाली आहे याचा आम्हाला आनंद आहे, कोमलची आई विजयमाला इंगोले यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *