महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२० जानेवारी । गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या दौऱ्याला पंकजा मुंडे या अनुपस्थित होत्या त्यामुळे चर्चेला आणखी उधाण आलं. पंकजा मुंडे या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील सुरू होती. मात्र आता यावर खुद्द पंकजा मुंडे यांनीच प्रतिक्रिया देत चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्यांनी सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. मी भाजपाच्या कुशीत वाढेलेली आहे, मी खरीखुरी कार्यकर्ता आहे असं मुंडे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
भाजपच्या कुशीतील वाढलेली मी खरीखुरी कार्यकर्ता आहे. भाजप आणि मुंडे साहेब यांना कधीही वेगळं करता येणार नाही, असं म्हणत त्यांनी पक्षप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. तसंच भाजप पक्ष म्हणजे एक व्यक्ती नाही तर ती एक संस्था आहे, असं म्हणत त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. मी पक्षाचे सर्व प्रोटोकॉलचे पालन करते असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारार्थ बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत त्या बोलत होत्या.
पंकजा मुंडे यांनी आज गेवराईमध्ये बोलताना आपण पक्षावर नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र दुसरीकडे गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या गैरहजर होत्या त्यामुळे पंकजा मुंडे या भाजपवर नाराज आहेत का? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता.