महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२१ जानेवारी । शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी खासगी विनाअनुदानित शाळांमधील 25 टक्के जागांवर होणाऱ्या आरटीई प्रवेशाला सुरुवात झाली आहे. यंदा नव्याने सुरू झालेल्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये सुरुवातीची तीन वर्षे आरटीई प्रवेश राबवू नयेत, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सर्व शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षकांना दिल्या आहेत. या शाळांची गुणवत्ता आणि सर्वसाधारण प्रवेश तपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत निर्णय घ्यावा, असेही गोसावी यांनी म्हटले आहे.
आरटीई प्रवेशासाठी येत्या सोमवार, 23 जानेवारीपासून पात्र असणाऱ्या शाळांच्या ऑनलाइन नोंदणीला सुरुवात होणार आहे. 3 फेब्रुवारीपासून नोंदणीची प्रक्रिया सुरू राहणार असून सर्व पात्र शाळांची 100 टक्के नोंदणी करण्याच्या सूचनाही गोसावी यांनी दिल्या आहेत. आरटीच्या पोर्टलवर शाळा नोंदणी करताना लगतच्या तीन वर्षांचे आरटीई विद्यार्थ्यांचे प्रवेश वगळून इतर 75 टक्के विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संख्या गृहीत धरून त्यास 3 ने भागाकार करून येणारी संख्या ही त्या शाळेची आरटीईची प्रवेश क्षमता राहील, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.
ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई 25 टक्केअंतर्गत शाळेत प्रवेश घेतला आहे, सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. तसेच प्रवेश अर्ज भरताना चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदर प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच एकापेक्षा जास्त प्रवेश अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सदर अर्ज सोडतीसाठी विचारात घेतला जाणार नाही.