महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ जानेवारी । अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शिंदे गटातील नेते शंभुराज देसाई यांची भेट घेतली. या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यानंतर आता खुद्द अजित पवार यांनी पार्थ पवार आणि शंभुराज देसाई यांच्या भेटीवर थेट शब्दांत भाष्य करताना रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांना पार्थ पवार आणि शंभुराज देसाई यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर, राजकीय विरोधक म्हणजे कुणी दुष्मन नव्हे. एकमेकावर राजकीय टीकात्मक बोलले तरी विकास कामाबाबत चर्चा, संवाद होतच असतो. मी मंत्री असताना अनेक राजकीय नेते भेटत होतो. अशा अनौपचारिक बैठकीमध्ये विकास कामाबाबत चर्चाही केली जाते. आमचे पक्ष निराळे आहे म्हणजे राजकीय दुष्मनी नाही. सत्ताधारी, विरोधक म्हणजे आम्ही काही शत्रू नाही, हे समजून घ्यावे, असे अजित पवार यांनी सांगितले.