‘जमलेल्या माझ्या तमाम …… ; व्यंगचित्रकार ते हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२३ जानेवारी । बाळ ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव रमाबाई ठाकरे आणि वडील केशव सीताराम ठाकरे हे प्रबोधनकार म्हणून ओळखले जात होते. ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो’ म्हणत त्यांच्या भाषणाला सुरुवात होते. वडिलांचे अमूल्य वचन आठवत बाळासाहेब म्हणतात, मला माझ्या वडिलांनी सांगितले होते भाषण करु नको, तर लोकांशी बोल. आयुष्यात हात नेहमीच स्वच्छ ठेव बाळ. हात स्वच्छ राहतील तर उभ्या आयुष्यात ब्रम्हदेव जरी खाली उतरले तरीही कोणालाही भिण्याचे कारण नाही. मराठी अस्मिता जपणारा झुंजार नेता बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणातील हा अंश.

‘जमलेल्या माझ्या तमाम,  व्यंगचित्रकार , हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे,

जेव्हा बाळासाहेबांचे पाऊल जाहीर सभेच्या मंचावर पडत असे तेव्हा ‘कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला’ ही एकच गर्जना आसमंतात दुमदुमायची. बाळासाहेब ठाकरे फक्त राजकारणी होते असे नव्हे तर ते एक उत्तम वक्ता, व्यंगचित्रकार, संपादक तसेच कलेची जाण आणि आदर ठेवणारे व्यक्तीमत्व होते. 23 जानेवारी हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस. महाराष्ट्रभर वेगवेगळे सामाजिक उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन करुन बाळासाहेबांना अभिवादन केले जाते. आज थोडक्यात जाणून घेऊया बाळासाहेबांच्या कर्तृत्वाविषयी.

बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी अथांग मेहनत, परिश्रम आणि जिद्द दाखवत संपूर्ण महाराष्ट्रात मराठी माणसाला मानसन्मान मिळवून दिला. ‘साम दंड भेदाच्या मार्गाने जाऊनी जिंकली लोकांची मने, बनूनी लोकनेता जनतेच्या मनी दिले हिंदूत्वरक्षकाचे धडे’, असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती.

बाळासाहेबांनी एकदा सभेत हॉटेल्सची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे असे म्हटले. तोच मराठी माणसामधील एकाचे तरीही पंचतारांकीत हॉटेल आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. शेवटी उत्तर एकाचेही आले नाही. कामासाठी कधीच कमीपणा न बाळगता आपल्या समोरील काम जिद्दीने करणे यातच मोठा थोरपणा माना. तर नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देण्याची महत्वाकांक्षा प्रत्येक मराठी माणसाने आपल्या उरी बाळगली पाहिजे असा मोलाचा संदेश बाळासाहेबांनी शिवसैनिकांना नेहमीच दिला.

बाळासाहेबांचा जन्म
बाळासाहेब ठाकरे यांचे पूर्ण नाव बाळ केशव ठाकरे होते. ते एक भारतीय राजकारणी होते ज्यांनी शिवसेनेची स्थापना केली. ते उजव्या विचारसरणीचे समर्थक आणि व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते.

बाळासाहेबांचे कुटुंब
श्रीकांत ठाकरे (राज ठाकरे यांचे वडील), रमेश ठाकरे आणि पाच बहिणी (संजीवनी करंदीकर, प्रभावती (पामा) टिपणीस, सुधा सुळे, सरला गडकरी आणि सुशीला गुप्ते) ही बाळासाहेबांची भावंडे होती. त्यांचे वडील केशव ठाकरे हे व्यवसायाने पत्रकार आणि व्यंगचित्रकार होते. 1950 च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेणारे ते सामाजिक कार्यकर्ते आणि लेखकही होते. बाळ ठाकरे हे त्यांच्या वडिलांच्या राजकीय तत्वज्ञानाने प्रेरित होते.

व्यंगचित्रातून मर्मावर बोट
ठाकरे यांनी कारकिर्दीची सुरुवात मुंबईतील फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून केली. टाईम्स ऑफ इंडियाच्या रविवारच्या आवृत्तीत त्यांची व्यंगचित्रेही प्रकाशित झाली. ठाकरे यांचे फ्री प्रेस जर्नलशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी व राजकारणी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासह चार-पाच जणांनी ती नोकरी सोडली आणि स्वत: चे दैनिक न्यूज डे सुरू केले. 1960 मध्ये त्यांनी भाऊ श्रीकांत यांच्याबरोबर एक कार्टून साप्ताहिक मार्मिकची सुरुवात केली. त्यात त्यांनी सामान्य मराठी लोकांच्या समस्यांना वाचा फोडली. बेरोजगारी, परप्रांतीय, मराठी कामगार, सामान्य मराठी माणसांच्या मुद्द्यांवर भर दिला. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला.

शिवसेना पक्षाची स्थापना
महाराष्ट्रात निर्माण झालेले मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा म्हणून 19 जून 1966 मध्ये त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना नावाचा एक पक्ष स्थापना केला.

शिवसेनेचे सरकार आणले
1995 मध्ये भाजप-शिवसेना युतीने महाराष्ट्रात आपले सरकार बनवले. शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तथापि, 2005 मध्ये मुलगा उद्धव ठाकरे यांना अधिक महत्त्व दिल्याने नाराज झालेला त्यांचे पुतण्या राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि 2006 मध्ये त्यांनी त्यांचा ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ हा नवा पक्ष स्थापन केला. बाळ ठाकरे हे त्यांच्या चिथावणीखोर विधान करण्यात प्रसिध्द होते आणि यामुळे त्यांच्यावर असंख्य खटले दाखल झाले. त्यांना हिंदुहृदयसम्राट तसेच सरसेनापती या नावानेही जाणले जाते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *