महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २४ जानेवारी । देशाच्या उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट सुरू आहे. त्याचे परिणाम महाराष्ट्र तसेच दक्षिण महाराष्ट्रातही दिसत आहे.उत्तरेकडील थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रातही आज किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत पुन्हा थंडी वाढली आहे. पारा पुन्हा 10 अंशांच्या खाली उत्तर भारतात सक्रीय असणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे हवामानातही मोठे बदल होत आहेत. राज्याच्या अनेक भागात यामुळे तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. तसेच, महाराष्ट्रासह उत्तरेकडील काही राज्यात पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम असून काही ठिकाणी पारा पुन्हा 10 अंशांच्या खाली गेला आहे. आज हा गारठा कायम राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
सोमवारपासून थंडीचा जोर वाढला
सोमवारपासूनच राज्यात थंडीने पुन्हा जोर धरल्याचे दिसत आहे. दिवसा सूर्यप्रकाश असतानाही शहरामध्ये नागरिकांना बोचऱ्या वाऱ्याचा सामना करावा लागला होता. मंगळवारीसुद्धा असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच, पुढील दोन दिवस किमान तापमानात घट होईल, अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
हिमाचल प्रदेशात सतर्कतेचा इशारा
हिमाचल प्रदेशामध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स पुन्हा एकदा सक्रीय झाल्यामुळे पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाकडून पुढील 48 तासासाठी या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रचंड हिमवृष्टी होणार असल्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारीलासुद्धा देशभरात थंडीचा कडाका कायम असेल. अशा परिस्थितीत पावसाचा शिडकावा झाल्यामुळे गारठा वाढू शकतो.
काश्मिरात हाडे गोठवणारी थंडी
काश्मीर आणि लडाखमधील पर्वतीय भागांमध्ये सातत्यानं तापमान कमी होत असून, हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदानुसार या प्रदेशाच्या मैदानी भागात प्रचंड हिमवृष्टी आणि काही भागांमध्ये पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. 25 जानेवारीपर्यंत अशीच परिस्थिती कायम असेल. हवाई वाहतुकीवरही याचे थेट परिणाम होणार आहेत. नागरिकांना हाडे गोठवणाऱ्या थंडीचा सामना करावा लागणार आहे.