श्री गणेश जयंतीमुळे मंदिरांमध्ये उत्साहाचे वातावरण; विद्युत रोषणाईने उजळली मंदिरे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २५ जानेवारी । ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’असा जयघोष… सनई-चौघड्याचे मंजूळ स्वर… शंखनाद… अशा भक्तिमय वातावरणात बुधवारी (दि. 25) शहरातील गणेश मंदिरांमध्ये श्री गणेश जयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ता फुलांनी मंदिरे सजली असून, विद्युतरोषणाईने मंदिरे उजळली आहेत. श्री गणेश जयंतीसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून, मंदिरांमध्ये अभिषेक, आरतीसह पारंपरिक पद्धतीने श्री गणेश जन्मसोहळा साजरा करण्यात येणार आहे.

तर गणेश याग, अथर्वशीर्ष पठण, भजन-कीर्तनासह मिरवणूकही काढण्यात येणार असून,भाविकांना मंदिरांत दिवसभर गणरायाचे दर्शन घेता येणार आहे आणि यानिमित्ताने महाप्रसादाचेही आयोजन केले गेले आहे. याशिवाय मंडळांकडूनही विविध धार्मिक-सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बुधवारी साज-या होणार्‍या श्री गणेश जयंतीनिमित्त दुपारी मंदिरांमध्ये जन्मसोहळा साजरा करण्यात येणार आहे. मंदिरांच्या रीतीरिवाजाप्रमाणे आणि परंपरेप्रमाणे जन्मसोहळा साजरा होईल.

त्यानंतर सायंकाळी नगरप्रदक्षिणाही अथवा मिरवणुकीचेही आयोजन केले गेले आहे. ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात सनईचौघडा वादन, गणरायाला अभिषेक आणि गणेश याग, श्रींची जन्मआरती, नारदीय कीर्तन, शेजारती आणि छबिना असेल, तर श्री देवदेवेश्वर संस्थानच्या सारसबागेतील श्री गणपती मंदिरात सकाळी गणेश याग आणि सायंकाळी सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांची प्रकट मुलाखत मिलिंद शिंत्रे हे घेणार आहेत, तर पौड फाटा येथील श्री दशभुजा गणपती मंदिरात सकाळी गणेश याग, मोगरा फुलला कार्यक्रम, भक्तिसंगीत आणि सायंकाळी अथर्वशीर्ष पठण आणि सत्संग यांचे आयोजन केले आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बुधवारी पहाटे उस्मान खान हे सतारवादनातून ‘श्रीं’च्या चरणी स्वराभिषेक अर्पण करणार आहेत. मुख्य गणेशजन्म सोहळ्याला दुपारी 12 वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी पहाटे 3 वाजता मंदिरात ब्राह्मणस्पती सूक्त अभिषेक होणार आहे. सकाळी 7 वाजता गणेश याग, दुपारी 3 वाजता सहस्त्रावर्तने होणार आहेत. सायंकाळी 6 वाजता नगरप्रदक्षिणा आयोजित केली आहे. तसेच रात्री 10 ते पहाटे 4 वाजेपर्यंत मंदिरामध्ये गणेशजागर होणार आहे.मंडळाच्या ठिकाणी सकाळी पारंपरिक पद्धतीने जन्मसोहळा आणि त्यानंतर दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

काही मंडळांनी महाप्रसादाचेही आयोजन केले असून, दिवसभर भाविकांना भक्तिगीतेही ऐकायला मिळणार आहेत. मंडळांच्या ठिकाणी देखणी सजावटही केली आहे. याशिवाय घराघरांतही श्री गणेश जयंतीसाठी जोमाने तयारी केली गेली असून, भाविक या दिवशी उपवासही करणार आहेत. तर घराघरांतही विधिवत पद्धतीने पूजाअर्चा होणार असून, पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी मंगळवारी (दि. 24) रविवार पेठ, मंडई, तुळशीबाग आदी ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली. एकूणच गणेश जयंतीचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *