सिंधुदुर्गात भाजपा आणि ठाकरे गटात तुफान राडा, धक्काबुक्की, हणामारी, आमदार वैभव नाईकही रस्त्यावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २५ जानेवारी । राजकीय दृष्ट्या संवेदनशिल असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत काल पुन्हा एकदा भाजपा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाण झाली. कणकवलीमधील कनेडी गावातील बाजारपेठेत भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याने या वादाला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या कार्यालयात घुसून धक्काबुक्की केली. यावेळी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हेही घटनास्थळी दाखल झाले. यादरम्यान, हातात दांडा घेऊन जमावासमोर गेलेल्या वैभव नाईक यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार काल सकाळच्या सुमारास भाजपाचे पदाधिकारी असलेल्या संदेश सावंत यांनी कनेडी बाजारपेठेमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते असलेल्या रिक्षाचालक कुणाल सावंत यांना किरकोळ वादानंतर मारहाण केल्याने या वादाला तोंड फुटले. या मारहाणीनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते जाब विचारण्यासाठी भाजपाच्या कार्यालयात गेले. त्यावेळी शाब्दिक बाचाबाची होऊन प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले. तसेच संदेश सावंत यांच्यासह भाजपाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाली.

त्यानंतर भाजपाचेही कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी संजना सावंत यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या कार्यालयावऱ चाल केली. तिथेही धक्काबुक्की झाली. यादरम्यान, आपला मोबाईल हरवल्याचा दावा संजना सावंत यांनी केला. तसेच तो परत मिळवून द्या, अशी मागणी करत त्यांनी पोलिसांशी हुज्जतही घातली.

तर वाद विकोपाला जात असल्याची वार्ता पसरल्यावर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर जमू लागले. तसेच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत हेही कार्यालयात दाखल झाले, यावेळी स्वत: वैभव नाईक हे हातात दांडा घेऊन शिवसैनिकांवर चाल करून येत असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना सामोरे जात असल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. तसेच दहशत खपवून घेतली जाणारा नाही असा इशाराही ठाकरे गटातील नेते सतीश सावंत यांनी दिला.
दरम्यान, या राड्यामध्ये दोन्हीकडून लाठ्या काठ्या आणि काचेच्या बाटल्यांचाही एकमेकांवर मारा करण्यात आला. त्यात कुंभवडेचे माजी सरपंच आप्पा तावडे हे डोक्यावर लाकडी दांडा बसल्याने जखमी झाले. तर कुणाल सावंत आणि भाजपा कार्यकर्ते रुपेश सावंत हेही जखमी झाले. या घटनेनंतर कनेडी बाजारपेठेत तणावाचे वातावरण होते. तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *