पुणे जिल्ह्यातील सीएनजी पंप चालकांचा शुक्रवारपासून बेमुदत बंदचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २५ जानेवारी । सीएनजी पुरवठाधारकांना शासनाने मंजूर केलेले वाढीव सेवामूल्य (कमिशन) मिळावे, या मागणीसाठी पंप चालकांनी शुक्रवारपासून (२७ जानेवारी) बेमुदत बंदचा इशारा दिला आहे. याबाबत पंप चालकांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पत्र दिले आहे.

ग्रामीण भागात गुजरातमधील टोरेंट गॅस कंपनी सीएनजीचा पुरवठा करते. मात्र, विक्रेत्यांना शासनाने मंजूर केलेले वाढीव सेवामूल्य देण्यास ही कंपनी टाळाटाळ करत आहे. केंद्र शासनाने सीएनजी वितरकांसाठी वाढीव सेवामूल्य जाहीर केले आहे. पुणे शहराला सीएनजी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने वाढीव सेवामूल्य विक्रेत्यांना दिले. मात्र, ग्रामीण भागात पुरवठा करणाऱ्या टोरेंट कंपनी व्यवस्थापन देण्यास टाळाटाळ करत आहे. याबाबत यापूर्वीही विक्रेत्यांनी संप पुकारला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी विक्रेते आणि कंपनी व्यवस्थापनाची बैठक घेतली होती. त्यात कंपनीने सेवामूल्य देण्यासाठी वेळ मागून घेतला होता. त्यानंतरही वाढीव सेवामूल्य दिले जात नाही, कधीपर्यंत देणार हे सांगितले जात नाही, त्यामुळे विक्रेत्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सीएनजी पंप चालक संघटनेचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी दिली.

दरम्यान, सन २०२१ मध्ये सीएनजी विक्रेत्यांना सेवामूल्य (फेअर ट्रेड मार्जिन -कमिशन) जाहीर करण्यात आले. मात्र, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गॅस पुरवठा करणाऱ्या टोरेंट गॅस कंपनीला अनेकवेळा विनंती करूनही त्यांनी सेवामूल्य दिले नाही. जिल्ह्यातील सीएनजी वितरकांचे आजपर्यंत जवळपास आठ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा विक्रेत्यांकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील टोरेंट गॅस विक्रेत्यांनी २७ जानेवारीपासून अनिश्चित काळासाठी सीएनजीची खरेदी आणि विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *