महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ जानेवारी । भुसावळ तालुक्यासह सावदा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. 3.3 रिश्टर स्केल एवढी या भुकंपांची नोंद झाली आहे. नाशिक वेधशाळेपासून 278 किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली असून, भीतीचं वातावरण पसरलं आहे. आज सकाळी 10 वाजून 34 मिनिटांनी हा भूकंप झाला.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी 10 वाजून 34 मिनिटांनी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यासह सावदा परिसरात भूकंपाचे धक्के जाववले. सौम्य भूकंप असल्यानं फार नुकसान झालेलं नाही. मात्र या भूकंपामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 3.3 रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची नोंद झाली आहे. नाशिक वेधशाळेपासून 278 किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून शाळांमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले असून, मैदानावर बसवण्यात आले आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांकडून पत्रकार परिषद देखील बोलवण्यात आली आहे.