महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २८ जानेवारी । राज्यात अचानक थंडी गायब होऊन पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. मागच्या तीन आठवड्यात राज्यातील बहुतांश जिल्ह्यात थंडी पडली होती. परंतु मागील दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होत थंडी गायब झाली आहे. आज (ता. 28) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. तर किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. गुरुवारी (ता. २६) सायंकाळनंतर नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली ढगाळ हवामानामुळे राज्यात थंडी गायब झाली असून, शुक्रवारी (ता. २७) उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्र येथे राज्यातील नीचांकी ११ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान ११ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. उन्हाचा चटका कायम असल्याबरोबरच ढगाळ हवामानामुळे राज्यात उकाडा वाढला आहे. ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३३.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच चक्राकार वारे वाहत आहेत.
राज्यात औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, नांदेड, पुणे या जिल्हात हलक्या ते जोरदार सरी कोसळल्याने रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भुसावळ तालुक्यासह परिसरात धुक्याची चादर पसरली आहे. बदलत्या वातावरणामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गहू. हरभरा. कांदा यासह केळी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी थंडी जाणवत असून या बदलत्या वातावरणामुळे रब्बी पिकांवर रोगराई पसरण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पुणे जिल्ह्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत आहे. या ढगाळ हवामानाचा विविध पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्यातच जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्यास नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.