सुमित्रा महाजन महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी इच्छुक

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २९ जानेवारी । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे नवा राज्यपाल कोण? अशी खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दोन दिवसांपूर्वी सूत्रांनी पंजाबचे माजी मुख्यंमत्री अमरिंदर सिंग यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आता लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वतः आपण याबाबत इच्छुक असल्याचे सूचक विधान केले आहे.

वय झाले, पण देश-पक्ष प्रथम

पक्षाने ठरवले तर मला महाराष्ट्राचे पालक व्हायला आवडेल. आता वय झाले आहे. पण देश व पक्ष माझ्यासाठी नेहमीच प्रथम असेल, असे सुमित्रा महाजन यांनी म्हटले आहे. त्या डोंबिवलीत येथे नुकत्याच आयोजित झालेल्या पहिल्या बहुभाषिक पुस्तक आदान-प्रदान सोहळ्यात घेण्यात आलेल्या प्रकट मुलाखतीत बोलत होत्या.

भारताचा जगभरात आदर वाढला

सुमित्रा महाजन मध्य प्रदेशातील इंदूर येथून 8 वेळा लोकसभेच्या सदस्या म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी लोकसभेचे अध्यक्षपदही भूषवले. यावेळी त्या म्हणाल्या – स्वामी विवेकानंद यांनी भारत विश्वगुरू होणार असे भाकीत वर्तवले होते. आपल्या देशाची प्रगती सध्या त्याच मार्गाने सुरू आहे. सद्यस्थितीत भारत आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यादृष्टिकोनातून सरकार ठाम भूमिका घेत आहे. त्यामुळे भारताविषयी जगभरात आदरभावना निर्माण झाली आहे, असे महाजन म्हणाल्या.

लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची गरज

या समारंभात त्यांनी नगरसेविका ते लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत मारलेल्या मजलीचाही प्रवास उलगडला. सुमित्रा महाजन पुढे बोलताना म्हणाल्या – देशाची प्रगती करण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही. नागरिकांचीही आहे. आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी चुकीचा वागत असेल, तर मतदारांनी त्याला त्याचा जाब विचारला पाहिजे. आजकाल देवाला वाटून घेतले जाते, तसे मोठ्या माणसांनाही वाटून घेतले जात आहे. हा चुकीचा पायंडा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *