छत्रपती उदयनराजे – राज ठाकरे यांच्यात फोनवर चर्चा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३० जानेवारी । मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी रविवारी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर या निवासस्थानी भेट दिली. यावेळी अमित ठाकरे यांनी वडील राज ठाकरे यांना उदयनराजेंशी फोन जोडून दिला. उदयनराजे व राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली. यावेळी उदयनराजेंनी आपण दोघे लवकरच भेटू, अशी ग्वाही दिली. अमित ठाकरेंची जलमंदिरवर भेट आणि राज ठाकरेंशी झालेली चर्चा यामुळे सातार्‍याच्या राजकीय वर्तुळात औत्सुक्य निर्माण झाले आहे.

खा. उदयनराजे व अमित ठाकरे यांनी भेटीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. उदयनराजे म्हणाले, राजकारणात काय चाललंय हे बघताय. राज ठाकरे हे स्पष्ट वक्तव्य करतात. माणूस एखादे चांगले काम करत असताना त्याला कसे हाणून पाडायचे हे आता सुरू आहे. राज्यात एवढे इशू आहेत की त्यात अमितने लक्ष घातले पाहिजे. पण इशूचा नॉन इशू होतो अन् नॉन इशूचा इशू होतो. अजून आमची इनिंग संपली नाही. अमित भेटायला आल्यानंतर मला मुलगा भेटायला आल्यासारखे वाटले. अमितने आता युवकांची धुरा हातात घेतली आहे. नवीन पिढी राजकारणात येतेय ही चांगली गोष्ट आहे.

तरुणांनाही पुढे आले पाहिजे तरच लोकांची सेवा होईल. प्रबोधनकार ठाकरेंपासून ठाकरे घराण्याचा इतिहास असून तो बाळासाहेब, उद्धव, राज आता अमित यांनी जपला असून अमितने त्याचा नावलौकीक केला पाहिजे. अमित ठाकरे म्हणाले, मी राजेंना पहिल्यांदा भेटलो आहे. सातार्‍यात आलो आणि त्यांना भेटलो नाही असे होणार नाही. आमच्या घराण्याचे आणि राजेंचे खूप जुने संबंध आहेत. राजेंचा स्वभाव खूप दिलखुलास आहे हे ऐकले होते. मात्र, आज प्रत्यक्षात ते अनुभवले. यावेळी माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, मनसे जिल्हाध्यक्ष युवराज पवार, शहराध्यक्ष राहुल पवार आदी मनसे सैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *