Pimpri Chinchwad : चिंचवड विधानसभेसाठी उद्यापासून रणधुमाळी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० जानेवारी । चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळवारपासून (ता. ३१) उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने पोटनिवडणुकीची रंगत वाढणार आहे. मात्र, ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भारतीय जनता पक्षाने विरोधकांना पत्र देऊन साकडे घातले आहे. त्यावर, वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, असे सर्वच राजकीय पक्षांच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार की लढविली जाणार, लढविल्यास उमेदवार कोण असणार हे अद्याप गुलदस्तात आहे.

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. ती बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. पक्षाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी सर्व पक्षांच्या शहराध्यक्षांची भेट घेऊन निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पत्र दिले आहे.

अखेर, निवडणूक झाल्यास संपूर्ण तयारीनिशी निवडणूक लढवली जाईल, असेही भाजप नेत्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. यासाठी बैठकांची सुरवात झाली आहे. महाविकास आघाडीचीही प्राथमिक बैठक झाली आहे.

त्यातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी निवडणूक लढविण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आघाडी वा अन्य पक्ष निवडणूक लढविणार की बिनविरोध होणार, निवडणूक झाल्यास उमेदवार कोण असणार? याचा सस्पेन्स अद्यापपर्यंत कायम आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महापालिकेतील २४५ कर्मचारी व अधिकारी नियुक्त केले आहेत. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. यामध्ये इ क्षेत्रीय कार्यालय अधीक्षक ज्ञानेश्वर ढवळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

मतदान कर्मचारी प्रशिक्षण नियोजनासाठी कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी, टपाली मतदानासाठी सहायक आयुक्त राजेश आगळे, निवडणूक साहित्य संकलन व वितरणासाठी भांडार अधिकारी मुबारक पानसरे, मतदान यंत्रे व स्ट्रॉंगरुमसाठी सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, कर्मचारी भत्ता वाटप लेखाधिकारी अरुण सुपे, वाहन परवाना प्रशासन अधिकारी राजीव घुले,

आचारसंहिता कक्षासाठी कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, मीडिया सेलसाठी किरण गायकवाड, वाहन अधिग्रहण विभागासाठी कार्यव्यवस्थापक कैलास दिवेकर, वाहतूक आराखडा व व्यवस्थापनासाठी पीएमपीचे दत्तात्रेय माळी, उमेदवार खर्च विभागासाठी लेखाधिकारी इलाही शेख, मतदार याद्यांसाठी सहायक आयुक्त सीताराम बहुरे आदी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

निवडणूक वेळापत्रक

३१ जानेवारी ः उमेदवारी अर्ज भरणा प्रक्रिया सुरू

७ फेब्रुवारी ः उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

८ फेब्रुवारी ः उमेदवारी अर्ज माघार

१० फेब्रुवारी ः अर्ज माघारीचा शेवटचा दिवस

२६ फेब्रुवारी ः मतदान

२ मार्च ः मतमोजणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *