महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३१ जानेवारी । मागील दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागांत वातावरणात मोठा बदल झाला आहे. रात्री आणि पहाटे प्रचंड थंडी, दुपारी कडाक्याचे ऊन तसेच भल्या पहाटे धुके, असे विचित्र वातावरण सध्या बघावयास मिळत आहे. त्यातच काही भागांत दवबिंदू देखील पडत आहे. हे वातावरण रब्बी हंगामातील पिकांसाठी अतिशय घातक आहे. सध्या गहू, हरभरा आणि कांदा पीक जोमदार स्थितीत असल्याने या पिकांना वाचविण्यासाठी शेतकर्यांनी औषध फवारणीला सुरुवात केली आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात सोमवारी (दि. 30) सकाळी पडलेल्या दाट धुक्यामुळे कांदा पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव होणार आहे. यामुळे कांदा उत्पादक धास्तावले आहेत. सततचे ढगाळ हवामान. त्यात आता दाट धुके, यामुळे कांदा पिकावर महागड्या औषधांची फवारणी करावी लागणार आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पारगाव, शिंगवे, काठापूर, वळती, नागापूर, रांजणी आदी परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ हवामानाचे सावट निर्माण झाले आहे. सोमवारी सकाळी दाट धुके पडले.
दिवस उजाडल्यानंतरही उशिरापर्यंत हे धुके पडलेलेच होते. त्यामुळे वाहनांना दिवे लावून प्रवास करावा लागला. दूषित वातावरणामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सुरुवातीपासून ढगाळ हवामान, त्यातच आता दाट धुक्याची भर पडल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली आहे. सध्या कांदा पीक दीड महिन्याचे झाले आहे. गहू पीकही ओंबीवर आले आहे. हरभरा पीक फुलोर्यात आहे. परंतु, वातावरण दूषित झाल्याने या पिकांवर विविध रोगराईंचा प्रादुर्भाव होणार आहे.
ढगाळ वातावरण, त्यातच सोमवारी (दि. 30) सकाळी पडलेल्या दाट धुक्यामुळे कांदा तसेच अंजीर उत्पादकांची चिंता वाढली आहे. कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. परिणामी, उत्पन्नात घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. अंजिराचा खट्टा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून, मिठ्ठा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. दाट धुक्यामुळे अंजिरावर करपा, तांबेरा तसेच फळांवर टीक पडणे अशा रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अंजीर हे पीक शेतकर्यांना हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. महागडी औषध फवारणी करून देखील रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. परिसरात गहू सध्या फुलोर्यात आहे. परंतु, धुक्यामुळे गव्हावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.