महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३१ जानेवारी । पुणे । चार वर्षांत रिंगरोडचे काम पूर्ण करण्याचा मास्टर प्लॅन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआय) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केला आहे. याच रिंगरोडभोवती केवळ पुण्यातीलच नव्हे, तर देशातील बड्या बिल्डरांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. ऑक्टोबरपासून रिंगरोडच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येणार असून, त्या दृष्टिकोनातून प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
पालखी मार्गांपाठोपाठ आता रिंगरोडचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात येणार असल्याने बांधकाम पुणे हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरत आहे. वेगाने विकास होण्याची क्षमता येथे असून, रिंगरोड हा एक ‘गेमचेंजर’ प्रकल्प म्हणून देशात ओळखला जाणार आहे. रिंगरोडमुळे या परिसरातील लोकांच्या राहणीमानात लक्षणीय बदल होणार आहे.
रिंगरोडभोवतीच्या जमिनीला आता सोन्याचा भाव आला आहे. एकरला कोट्यवधी रुपये दर देऊन रिंगरोडभोवती जमिनी खरेदी करण्यावर बांधकाम व्यावसायिकांकडून भर देण्यात येत आहे. खरेदीसाठी नेतेमंडळी सरसावली आहेत. भूसंपादन मोबदल्यासंदर्भातील निर्णय जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती घेणार असली तरी या भूसंपादनातून मोठा आर्थिक लाभ मिळवून घेण्यासाठी काही राजकीय नेतेमंडळी देखील सरसावली आहेत. यातूनच या भागातील जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार वेगाने सुरू झाले आहेत.
विहिरी वाढू लागल्या; फळझाडेही लावली
रिंगरोड भूसंपादनासाठी बागायती जमिनीसाठी अधिकचा दर तर कोरडवाहू जमिनीसाठी कमी दर राहणार आहे. शिवाय संबंधित शेतीमधील फळझाडे, विहिरी असतील तर त्यासाठी अधिकची रक्कम मिळणार आहे. याचाच फायदा उठविण्याचा निर्णय काहींनी घेतला आहे. त्यानुसार संबंधित गावांच्या शेतशिवारात चक्क बंगळुरू व अन्य ठिकाणाहून 8 ते 10 फुटांची फळझाडे आणून लावण्यात आली आहेत. काहींनी यंत्राच्या सशाहाय्याने विहिरीही घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, शासनदफ्तरी 3 वर्षांपूर्वी जी जमीन कोरडवाहू म्हणून नोंद होती ती आता बागायती व काही ठिकाणी अकृषिक असल्याचेही दिसून येत आहे. म्हणजेच रिंगरोडच्या भूसंपादन मोबदल्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा निर्णय काहींनी घेतल्याचे दिसत आहे.