Devendra Fadanvis : चिंचवड, कसबा बिनविरोध होण्यासाठी फडणविस म्हणाले ‘निवडणूक न झालेली…’

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ फेब्रुवारी । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर आता कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधी पक्षनेते यांना आवाहन केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मुलाच्या लग्नासाठी दिल्लीमध्ये आहेत. यावेळी त्यांनी कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचं आवाहन विरोधकांना केलं आहे.

ते यावेळी बोलताना म्हणाले की, ‘मी स्वत: काही नेत्यांशी बोललो आहे. बावनकुळे यांनाही सर्व पक्षांना विनंती केली आहे. निवडणूक न झालेली बरी, वर्ष बाकी आहे. अजितदादांनी विचार करावा,’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले की, ‘चिंचवड आणि कसबा दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या निवडणुका बिनविरोध व्हावी, अशी आमची आशा आहे. पण निवडणुका झाल्या तर भाजप लढवणारच आहे. मुख्यमंत्र्यांनीही निवडणूका बिनविरोध संदर्भात नेत्यांना विनंती केली आहे. विरोधी पक्ष विनंतीला प्रतिसाद देतील,’ अशी अपेक्षा फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे.

एकीकडे भाजपकडून निवडणुका बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू असतानाच मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र निवडणूका लढवण्यावर ठाम आहेत. ‘निवडणुका बिनविरोध होण्याचं काहीच कारण नाही. त्यांनी कोल्हापूर, पंढरपूर देगलूरची निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही. मुंबईच्या बाबतीत त्यांनी निर्णय घेतला, म्हणजे बाकीच्या सगळ्या निवडणुका बिनविरोध होतील, हे त्यांनी डोक्यातून काढावं,’ असं अजित पवार यांनी दुपारी म्हंटलं आहे.

तर कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत. या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जयंत पाटील यांना फोन केला आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी उमेदवार न देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *