महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ फेब्रुवारी । पुण्यातील विधानसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान शहरात ‘कुलकर्णी, टिळकांनंतर आता नंबर बापटांचा का… ?’ असा प्रश्न विचारणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत (poster in Kasba Peth). या पोस्टर्समुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने (Hemant Rasane)यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान टिळक कुटुंबातील व्यक्तीला भाजपने उमेदवारी दिली नाही. यानंतर आता कसबा पोटनिवडणुकीत उमेदवरीवरून पुण्यात फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे.
मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठीतील विधानसभेची जागा रिक्त झाली. यानंतर भाजपकडून कसबा पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंबीयांना उमेदवारी देण्यात येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळाली नाही . यानंतर शहरात ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
पोस्टरवर काय लिहीलंय?
या पोस्टरवरती “कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा मतदारसंघ गेला आता नंबर बापटांचा का…??? समाज कुठवर सहन करणार? कसब्यातील एक जागरूक उमेदवार” असा मजकूर लिहण्यात आलेला आहे. हे फ्लेक्स पुणे शहरातील काही ठिकाणी लावण्यात आले आहेत. दरम्यान हा फ्लेक्स नेमका कोणी लावला? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भाजपला फटका बसणार?
कसबा पेठ मतदारसंघात ब्राम्हण समाजाचे मताधिक्य आहे. हा भाजपचा पारंपारिक मतदार समजला जातो. यादरम्यान टिळक परिवारातील उमेदवाराला डावलल्याने भाजपला पोटनिवडणूकीत फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.