महाविकास आघाडीचे जोरदार शक्तिप्रदर्शन, रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ७ फेब्रुवारी । कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीच्या वतीने यावेळी रॅली काढण्यात आली. कसबा पोटनिवडणुकीमध्ये धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे उमेदवार हेमंत रासने अशी तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे.

ढोल-ताशांच्या गजरात आणि फटक्यांच्या आतषबाजीत जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीच्या वतीने यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. नगरसेवक रवींद्र धंगेकर हे रविवार पेठ, कसबा पेठ परिसरातून सातत्याने पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. दोन वेळा शिवसेना, दोन वेळा मनसे आणि एक वेळा काँग्रेसचे सहयोगी नगरसेवक म्हणून ते निवडून आले आहेत. 2009च्या विधानसभा निवडणुकीत कसबा विधानसभा लढताना त्यांनी विद्यमान खासदार गिरीश बापट यांना नाकीनऊ आणले होते.

धंगेकर यांनी घेतली टिळक कुटुंबीयांची भेट
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी केसरीवाडय़ात जाऊन दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांची भेट घेतली. मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेस वंदन केल्यानंतर ते कसबा गणपती येथे रॅलीच्या ठिकाणी आले.

बावनकुळे यांच्याकडून विचित्र अट
टिळक कुटूंबाला डावलणाऱया भाजपने आता विचित्र ‘अटी’चे राजकारण सुरू केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संध्याकाळी शैलेश टिळक यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, उद्या (दि. 7) दुपारी 3 पर्यंत महाविकास आघाडीने कसब्याची निवडणूक बिनविरोध केली तर रासने यांना अर्ज माघारी घ्यायला लावू आणि टिळक कुटूंबातील व्यक्तीला आम्ही उमेदवारी देऊ, फॉर्म तयार आहे. दरम्यान, आधीच भाजपने टिळक कुटूंबातील व्यक्तीला का उमेदवारी दिली नाही? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच बावनकुळे यांनी मात्र याचे उत्तर दिले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *