महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ फेब्रुवारी । कसबापेठ विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत अर्ज सादर केलेल्या 29 उमेदवारांच्या 39 अर्जांची छाननी बुधवारी झाली. त्यात आठ उमेदवारांचे 11 अर्ज अवैध ठरले आहेत. त्यात एका उमेदवाराने अर्जावर स्वाक्षरीच केली नसल्याची बाब छाननीत समोर आली. त्यामुळे अपक्ष उमेदवार अमोल तुजारे यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला आहे.
कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यात मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्याची वेळ होती. त्यातील 29 उमेदवारांनी 39 अर्ज सादर केले होते. त्यातील आठ उमेदवारांचे अकरा उमेदवारी अर्ज बाद ठरले आहेत. त्यामुळे आता 21 उमेदवार शिल्लक असून, शुक्रवारी (दि.10) उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.