राज्याचा अर्थसंकल्प; शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प ९ मार्चला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ फेब्रुवारी । मुंबई महानगरपालिका निवडणुकांसह राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेता सर्वांचे लक्ष लागलेला राज्याचा अर्थसंकल्प येत्या ९ मोर्च रोजी सादर करण्यात येणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार असून या अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा होतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प सादर करतील. २७ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असून ते २५ मार्चपर्यंत चालणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक बुधवारी विधान भवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, दूरदृष्यप्रणालीद्वारे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, अशोक चव्हाण, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, जयंत पाटील, ॲड आशीष शेलार, अनिल परब, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, कपिल पाटील, अमीन पटेल, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत उपस्थित होते.

या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार २७ फेब्रुवारी ते २५ मार्चदरम्यान होणाऱ्या विधान परिषद व विधानसभा बैठकांच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली. अधिवेशनाची सुरुवात सोमवार, दिनांक २७ फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त अभिवादनाबाबतचा ठराव दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी दोन्ही सभागृहात याबाबत विशेष चर्चा होईल. अर्थसंकल्पावर तीन दिवस तर अर्थसंकल्पीय मागण्यावर सहा दिवस चर्चा करण्यात येणार आहे. विधेयकांपैकी प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त) ५ आणि प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता अपेक्षित) ८ अशी अंदाजे १३ विधयके या अधिवेशनात मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. दोन्ही सभागृहातील कामकाजासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *