महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ फेब्रुवारी । चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाने (Alibaba Exits India) भारतातून आपला व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याची तयारी केली आहे. अलीबाबाने पेटीएममधील आपले संपूर्ण शेअर्स ब्लॉक डीलद्वारे विकले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, चिनी कंपनी अलीबाबाने पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्समधील उर्वरित 3.16 टक्के थेट हिस्सा सुमारे 13,600 कोटी रुपयांना विकला आहे. या ब्लॉक डीलनंतर अलीबाबा पेटीएममध्ये भागधारक राहिलेला नाही.
अलीबाबा पेटीएमच्या सुरुवातीच्या गुंतवणूकदारांपैकी एक आहे. या करारानंतर अलीबाबाचा बाहेरचा मार्ग मोकळा झाला आहे. (Alibaba Exits India) चिनी कंपनीने यापूर्वी झोमॅटो आणि बिगबास्केटमधील आपली हिस्सेदारी विकली होती. डिसेंबर 2022 पर्यंत, पेटीएममध्ये अलीबाबाची 6.26 टक्के हिस्सेदारी होती. जानेवारीमध्ये त्यांनी 3.1 टक्के हिस्सा विकला होता. उर्वरित 3.16 टक्के भाग विक्रीचा करार शुक्रवारी (दि.10) झाला. या करारामुळे अलीबाबाने कंपनीतील आपले संपूर्ण शेअर्स विकले आहेत.
डिसेंबर तिमाहीतील चांगल्या कामगिरीमुळे पेटीएमचा तोटा कमी झाला. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर 2022 चे निकाल 3 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केले होते. तेव्हापासून 9 फेब्रुवारीपर्यंत, पेटीएम 34 टक्क्यांहून अधिक मजबूत झाला होता. पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सचे शेअर 9 टक्क्यांनी घसरले. कंपनीने डिसेंबर तिमाहीत ऑपरेटिंग नफा जाहीर केला होता. या कालावधीत कंपनीचा तोटा मागील वर्षातील 779 कोटी रुपयांवरून 392 कोटी रुपयांवर आला आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी होती. पण अलिबाबाच्या शेअर्सच्या विक्रीमुळे त्यात घट झाल्याचे दिसून येते.