महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ फेब्रुवारी । गोकुळच्या विक्री दरात 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दि. 11 फेब्रुवारीपासून ही दरवाढ लागू होणार असून ग्राहकांना आता प्रतिलिटरसाठी 66 रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या वर्षभरात गोकुळ दूध दरात एकूूण 12 रुपयांची वाढ झाली आहे.
मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने सध्या दुग्ध व्यवसायात स्पर्धा निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पुरवठा योग्य पद्धतीने होत नसल्याचे चित्र आहे. दूध सोसायटींमधून येणार्या दुधावर प्रक्रिया करून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दूध संघांना करावा लागणारा खर्च व दुधाचा विक्री दर यांचा ताळमेळ राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. दूध खरेदी दर वाढला की लगेच दुध विक्री दरात वाढ करण्यात येते. यापूर्वी 16 एप्रिल 2022 रोजी चार रुपयांनी झाल्यानंतर दूध दर 54 रुपये झाला होता.
1 ऑगस्ट रोजी पुन्हा दूध दरात 2 रुपयांनी, ऑक्टोबरमध्ये 4 रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबईत पूर्वी असणारा म्हशीच्या दुधाचा 69 रुपये प्रतिलिटर असणारा दर आता 72 रुपये झाला आहे. पुण्यात गोकुळ दुधासाठी 72 रुपये मोजावे लागणार आहेत. कोल्हापुरात हा दर 66 रुपये झाला आहे. गायीच्या दरातही 2 रुपयांची वाढ झाली असून मुंबईत गायीचे दूध प्रतिलिटर 56 रुपये, पुणे 56 व कोल्हापूर 50 रुपये दर झाला आहे. नवीन दरवाढीचा ग्राहकांना फटका बसणार आहे.