मोदी, शाह यांचे मुंबई-पुण्यातील दौरे वाढले ; शरद पवार यांचा एका वाक्यात समाचार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ फेब्रुवारी । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई आणि पुण्यातील दौरे वाढले आहेत. मुंबई-पुण्यासह राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तसेच पुण्यात दोन मतदारसंघात पोटनिवडणुका होणार आहेत. यामुळे मोदी आणि शाह यांचे हे दौरे वाढलेत का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मोदी आणि शाह यांना राज्यातील निवडणुका महत्त्वाच्या वाटत असाव्यात, अशा शब्दात शरद पवार यांनी मोदी आणि शाह यांच्यावर टीका केली आहे. ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

महापालिका निवडणुका येत आहेत. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महत्त्वाच्या वाटत आहेत असं वाटतं. त्यामुळेच ते पुन्हा पुन्हा येत असल्याचं दिसतंय. हरकत नाही. त्यांनी यावं. महाराष्ट्राला काही देणार असतील, महाराष्ट्राचं हित असेल तर विरोध करण्यास करण्याची गरज नाही. पण येऊन राजकीय भाषण करणार असतील तर त्याचा विचार त्यांनी करावा, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

यावेळी त्यांनी अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यावरही टीका केली. देशाच्या गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीसाठी पुण्यात दोन दोन दिवस घालवावे लागतात याचा अर्थ आमच्या कार्यकर्त्यांची कामे चांगली सुरू आहेत, असा चिमटा पवार यांनी काढला.

विनाकारण आत टाकले
अनिल देशमुख एक वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगात होते. त्यांच्याबाबत कोर्टाचा निर्णय आला आहे, कोर्टाने त्यात स्पष्ट मते मांडली आहेत. संजय राऊतही तुरुंगात होते. कोर्टाची ऑर्डर आली. त्यात राऊत यांचा मनी लॉन्ड्रिगशी संबंध नव्हता असं म्हटलंय. हे काय सांगतं?

नवाब मलिक आत आहेत. राज्यपातळीवरील लोकांबाबत काय भूमिका घेतली हे पाहिल्यानंतर इतरांबाबतची त्यांची भूमिका काय आहे हे भाजपने पाहावं, असं ते म्हणाले.

आमच्यात वाद नाही
महाविकास आघाडीत मतभेद आहेत का? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर आमच्यात वाद नाही. चर्चा होत असते. पण वाद नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन
दरम्यान, नाशिकच्या दिंडोरी तालूक्यातील कादवा कारखान्यात राष्ट्रवादीचे नेत शरद पवार यांच्या हस्ते आसवणीसह (डिस्टलरी) इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात देशात आणि राज्यात साखरेचे उत्पन्न जास्त झाल्याने साखरेची किंमत घसल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *