महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पिंपरी चिंचवड – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – कोरोनाविरूद्धच्या लढाईत भारताचे सुरू असलेल्या कामकाजाचे जगभरात कौतुक होत आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी भारताने उचलले पावलांची बहुतांश इतर देशांना मदत झाली आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार २२ मेला हर्ष वर्धन पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
सध्या डॉक्टर हिरोकी नकाटानी ३४ सदस्य असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या बोर्डाचे ते अध्यक्ष आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे दक्षिण पूर्व आशिया समुहाने गेल्या वर्षी सर्वानुमते भारताला तीन वर्षांसाठी कार्यकारी मंडळावर निवडले जावे असा प्रस्ताव ठेवला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी १९४ देशांच्या जागतिक आरोग्य सभेमध्ये भारताला कार्यकारी मंडळात नियुक्त करण्याबाबतच्या प्रस्तावावर सह्या झाल्या.
हर्षवर्धन यांची निवड २२ मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी बोर्डाच्या बैठकीत होईल. क्षेत्रीय गटांमध्ये अध्यक्ष पद एक वर्षासाठी दिलं जातं. गेल्या वर्षी हे ठरवण्यात आले होते. येत्या शुक्रवारपासून यातील पहिलं वर्ष सुरू होणार असून यासाठी भारताचा प्रतिनिधी कार्यकारी बोर्डाचा अध्यक्ष असणार आहे.
बोर्ड वर्षातून दोन वेळा बैठका घेत. मुख्य बैठक जानेवारीमध्ये होते. आरोग्य सभेनंतर मे महिन्यात आणखी एक लहान बैठक होते. कार्यकारी बोर्डाच्या अध्यक्षांचे मुख्य काम आरोग्य सभेचे निर्णय आणि निती तयार करण्यासाठी सल्ला देणं हे असते.
सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ७३ व्या जागतिक आरोग्य सभेत हर्षवर्धन यांनी सांगितलं की, कोरोना साथीचा सामना करण्यासाठी वेळेत सर्व आवश्यक ती पावले उचलली. तसंच कोरोनाला रोखण्यासाठी चांगली कामगिरी केली असून पुढच्या काही महिन्यात आणखी चांगले करू असा विश्वासही त्यांनी यावेळी दर्शवला.