महाराष्ट्रात २०० जागा जिंकू; फडणवीसांनी दिला कानमंत्र

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ फेब्रुवारी । आपल्या नेत्यांमधील कार्यकर्ता मेला तर भाजपचा काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही. नेते असाल तर नेत्यासारखे वागा, सर्वांना सामावून घ्यायला शिका, असे खडे बोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भाजप कार्यकारिणीच्या समारोपप्रसंगी बोलताना स्वपक्षीयांना सुनावले. अमरावतीमधील भाजपच्या पराभवाचा संदर्भ देत त्यांनी नेत्यांची कानउघाडणी केली.

२०१४ पासून आपल्याला निवडणुका जिंकायची सवय लागली आहे. आपण एक निवडणूक हरलो तरी चर्चा होते. विदर्भातील आणि त्यातही अमरावतीतील (रणजित पाटील) पराभवाचे आत्मचिंतन आपण केलेच पाहिजे. तीन हजार मतांनी आपला उमेदवार हरतो आणि त्या ठिकाणी सहा हजार बाद झालेली मते आपलीच असल्याचे दिसते. हे आत्मचिंतन करण्यासारखेच आहे. आपण सगळे नेते आहोत, नेत्यांनी नेत्यांसारखेच वागले पाहिजे; पण नेता हा नेताच राहिला आणि त्याच्यातील कार्यकर्ता मेला तर तो नेताही राहणार नाही. नरेंद्र मोदी हे आपले नेते आहेत; पण ते आजही संघटनेला पूर्णत: समर्पित, शरण आहेत. आपण त्यांच्याकडून शिकले पाहिजे. पक्षाला विचारल्याशिवाय ते कुठलाही निर्णय घेत नाहीत. आजही प्रचारकासारखे जीवन जगतात.

पक्षात इतरांना सामावून घ्यायला शिकले पाहिजे. ते सोडले तर आपल्यात आणि काँग्रेसमध्ये काहीही फरक राहणार नाही. कार्यकर्त्यांना स्थान राहिले नाही म्हणून काँग्रेस पक्ष रसातळाला गेला, तसेच आपल्याकडे झाले तर आपलीही तीच गत राहील, असे फडणवीस यांनी बजावले.

सात महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला येत्या दीड वर्षात पाच वर्षांची कामे करून दाखवायची आहेत. त्यासाठी ट्वेंटी-ट्वेंटी सारखी मॅच खेळणे सुरू झाले असून, २०२४ च्या निवडणुकीत दोनशे जागा जिंकूनच ही मॅच संपुष्टात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विजय डोक्यात जाऊ देऊ नका. एकमेकांना सोबत घेऊन समन्वयाने आपण पुढे गेलो तरच वारंवार जिंकू, असेही ते म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *