शिर्डीत सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना विषबाधा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ फेब्रुवारी । अमरावतीहून शिर्डीला सहलीसाठी आलेल्या ८२ विद्यार्थ्यांसह ६ शिक्षकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील आदर्श हायस्कूलमधील हे विद्यार्थी असून दोन दिवसांपूर्वी ते सहलीसाठी निघाले होते. शिर्डीत येण्यापूर्वी त्यांनी शेवगावजवळ दुपारचे जेवण केले आणि त्यानंतर शिर्डीत दाखल होत साईबाबांचे दर्शन घेतले. मात्र रात्री देवगड येथे मुक्कामी निघाले असताना विद्यार्थी आणि काही शिक्षकांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले.

विद्यार्थांना अधिक त्रास जाणवत असल्यानं शिक्षकांनी सर्व मुलांना रात्री शिर्डीच्या साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील काहींना तापही येऊ लागल्याने खबरदारी म्हणून रुग्णालयाने सर्व विद्यार्थांना देखरेखीखाली ठेवलं आहे. विशेष म्हणजे मुलांनी बाहेर कुठे काही खाल्लं नसल्याचं शिक्षक सांगत आहेत. जेवण तयार करण्याची सामुग्रीही सोबतच असल्याचं शिक्षकांकडून सांगितलं जात आहे. तर पाणी बदलामुळे उलट्या आणि जुलाब सुरू झाले असावेत, असा अंदाज डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

अमरावतीहून सहलीसाठी एकूण २२७ विद्यार्थी आले असून यातील ८२ विद्यार्थ्यांना त्रास झाला. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून साईनाथ रुग्णालयाचे सर्व डॉक्टर आणि स्टाफ विद्यार्थ्यांची काळजी घेत आहेत. परिस्थितीनुसार सायंकाळ विद्यार्थी आणि शिक्षकांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांना हा त्रास नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आलेलं नसून अचानक झालेल्या या त्रासामुळे विद्यार्थी काहीसे चिंतेत असल्याचं पाहायला मिळालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *