आरोग्यासाठी फायदेशीर ; गायीच्या शेणापासून बनवलेली कोल्हापुरी चप्पल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ फेब्रुवारी । कोल्हापुरी चप्पल म्हटलं की आपल्याला चामड्यापासून बनवलेली, करकर असा आवाज करणारी चप्पल डोळ्यासमोर येते. स्पेशल कोल्हापूरी चप्पलची ख्याती जगभरात पोहोचली आहे. पण याच कोल्हापूरच्या ब्रँडला कोल्हापुरातील एका व्यावसायिकाने वेगळे रूप दिले आहे. त्यांने चक्क गाईच्या शेणापासून कोल्हापुरी चप्पल बनवली आहे.

खरंतर सध्या नानाविध प्रकारच्या चप्पल बाजारात उपलब्ध असतात. मात्र, ही शेणापासून बनवलेली चप्पल इतरांपेक्षा वेगळीच आहे. कोल्हापूरच्या किरण माळी हे व्यावसायिक टोटल ग्रीन सेल्स अँड सर्व्हिसेस या कंपनीचे मालक आहेत. त्यांच्या कंपनीच्या मार्फत ते गायीच्या शेणापासून विविध वस्तू बनवतात. यामध्ये गायीच्या शेणापासून आणि गोमूत्र वापरून चप्पल, वेदिक रंग, गोक्रिट (बांधकामासाठी लागणाऱ्या विटा), धूप, शोपिस, वॉलपिस अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. सध्या त्यांनी कोल्हापूरची खास ओळख असणारी कोल्हापुरी चप्पल ही गायीच्या शेणापासून बनवली आहे. याला त्यांनी गोमय पादुका असे नाव दिले आहे.

खरंतर गायींचे जतन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने किरण हे काम करतात. गायीच्या शेणापासून गेल्या दोन वर्षांपासून अशा पादुका बनवल्या जात आहेत. पण कोल्हापुरी चप्पल घालण्याची बऱ्याच जणांची आवड असते. त्यामुळे या कोल्हापुरी पायतान (कोल्हापुरी चप्पल) च्या स्वरूपात या गोमय पादुका बनवल्या असल्याचे किरण माळी यांनी सांगितले.

कशा बनवल्या जातात गोमय पादुका ?
या गोमय पादुका बनवण्यासाठी फक्त देशी गाईचे शेण, लाकडाचा भुस्सा, लाकडी मैदा या गोष्टी वापरल्या जातात. यासाठी फक्त देशी गायीचे आणि ताजे शेणच वापरले जाते. त्यामध्ये बाकीचे दोन घटक मिसळून या पादुका बनवल्या जातात. त्यानंतर त्या वेगवेगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून टिकाऊ बनवल्या जातात, असं माळी यांनी सांगितले.

कुठे वापरता येतात या पादुका ?
या पादुका थोड्या नाजूक असतात. म्हणजेच या पादुका घराबाहेर न वापरता फक्त घरी किंवा ऑफिस मध्ये वापरासाठी आहेत. कारण या पादुका आपल्या चांगल्या आरोग्यासाठी वापरल्या जाव्यात या उद्देशानेच बनवलेल्या असल्याचे माळी यांनी स्पष्ट केले.

चप्पलमुळे फायदे झाल्याचा ग्राहकांचा अनुभव
कोल्हापुरी पद्धतीच्या पादुका जरी आत्ता बनवल्या असल्या तरी आम्ही गेले दोन वर्ष अशा गोमय पादुका बनवत आहोत. ग्राहकांच्या अनुभवातून त्यांनी त्यांचे विविध त्रास कमी झाल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हाडांचा त्रास अशा गोष्टींवर या पादुका परिणामकारक ठरल्याचे किरण माळी सांगतात.

किरण माळी यांनी बनवलेल्या या गोमय पादुका आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी तर आहेतच. पण आता या गोमय पादुकांच्या निमित्ताने कोल्हापुरी चप्पल वापरण्याची संधीही मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *