महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १८ फेब्रुवारी । महाशिवरात्रीनिमित्त शहरातील सर्व मंदिरांमध्ये फुलांची सजावट, विद्युत रोषणाई आणि भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंदिरांमध्ये महाआरती, अभिषेक, लघुरुद्र पूजा, होमहवन असे धार्मिक विधीही होणार आहेत. शिवनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून जाणार आहेत. मंदिरात उत्सव मंडपाची उभारणी, पताका-तोरणांची सजावट केली आहे तर हजारो भाविक दर्शनसाठी येणार असल्याने पुरुष आणि महिलांच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या रांगा करण्यात आल्या आहेत. शिवमंदिरांमध्ये उत्साहाचे, आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
महाशिवरात्रीनिमित्त मंदिरांसह मंडळांनीही खास तयारी केली आहे. महाशिवरात्री उत्सव आयोजित केला असून, पहाटेपासूनच मंदिरांमध्ये अभिषेक, महाआरती, लघुरुद्र महापूजा असे धार्मिक विधी होतील. तर त्यानंतर भक्तिगीते, व्याख्याने, प्रवचन आणि भजन-कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. मंदिरे दिवसभर दर्शनासाठी खुली राहणार असून, त्यासाठीची तयारी शुक्रवारी (दि.17) महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला पाहायला मिळाली. कामगार अन् मंदिरातील प्रतिनिधी तयारीला लागले होते.