कोश्यारींचा जाता-जाता गौप्यस्फोट : ……. पत्र दाखवल्यानेच राष्ट्रपती राजवट उठवली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २० फेब्रुवारी । राज्यपाल असताना सतत वादात राहणारे, ठाकरे सरकारविरोधात थेट भूमिका घेणारे भगतसिंह कोश्यारी यांनी जाता-जाता गौप्यस्फोट करून पुन्हा एकदा राजकीय चर्चेला खमंग फोडणी दिली आहे. फडणवीस-पवार यांचा पहाटे नव्हे, सकाळी आठ वाजता शपथविधी झाला. अजित पवार यांनी आमदारांच्या सह्या असलेले पत्र दाखविले. त्यामुळेच महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट उठली. त्यानंतर सरकार अस्तित्वात आले होते, असा दावा कोश्यारी यांनी केला आहे.

भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई तक या संकेतस्थळाला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे औटघटकेचे सरकार कसे आले, याची सुरस कथेचे कथन केले. आता यावर अजित पवार आणि फडणवीस काय बोलणार याची उत्सुकता आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी असताना भगतसिंह कोश्यारी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वादात राहिले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सतत वादग्रस्त वक्तव्ये करण्याचा सपाटा लावला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात राजकीय पक्षांनी दंड थोपटले. एकवेळ अशी आली की, भाजपलाही त्यांची पाठराखण करणे अवघड झाले. त्यामुळे त्यांची गच्छंती अटळ असल्याची चर्चा होती. अखेर महाराष्ट्राच्या राज्यपालपदी बैस आले. मात्र, महाराष्ट्रातून काढता पाय घेतानाही कोश्यारी यांनी दिलेली मुलाखत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

कोश्यारी काय म्हणाले?

१. आमच्याकडे एका मोठ्या पक्षाचे नेते आले. त्यांनी आमदारांच्या सह्या असलेले पत्र दाखवले. त्यांच्यासोबत एक दुसरे नेते होते. ( हे दोन्ही नेते म्हणजे अनुक्रमे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस.) मग राष्ट्रपती राजवट का उठवू नये?

२. राज्यपाल कधीही शपथविधीसाठी कुणाला बोलवत नाहीत. राजकारणात झटपट गोष्टी बदलतात. त्यात रात्रीत राष्ट्रपती राजवट उठल्याचे नवल काय? फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, कोर्टात आव्हान दिल्यानंतर अजित पवारांनी माघार घेत राजीनामा दिला.

३. महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीविषयी शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते जर तरची राजकीय भाषा करत आहेत. त्यांचे उच्च न्यायालयात लवासा प्रकरण आहे. त्यावर त्यांना दहावेळा विचार करावा लागेल. मी त्यांचा आदर करतो. माझ्या हस्ते त्यांना डी.लिट दिली.

४. मला वेळ मागितली. मी दिली. माझ्यावर कुठलाही दबाव नव्हता. काहीजण याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालय म्हणाले, तुम्ही वेळा दिला, तर आमदारांचा घोडेबाजार होईल. त्यामुळे बहुमत सिद्ध करायचा कालावधी मी कमी केला. माझ्या या भूमिकेवर कसा काय संशय घेता येईल?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *