महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – कोरोना संकटासंदर्भातील सर्व शक्यतांचा अभ्यास करून भविष्यातील उपाययोजनांचे काटेकोर नियोजन करा. ‘कोरोना’शी लढण्यासाठी योग्य नियोजन करत सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. येथील विधान भवनच्या ‘झुंबर हॉल’मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक शिस्त लावावी लागणार आहे. वैयक्तिक मास्कचा वापर, योग्य आंतर ठेवण्याची दक्षता घ्यावी व कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी नागरिकांच्यात जनजागृती करावी लागणार आहे. सूक्ष्म नियोजनाद्वारे प्रभावीपणे उपाययोजनांची अंमलबजावणी करा, लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या सीमेबाहेरून कुणी व्यक्ती येत असल्यास काटेकोरपणे तपासणी, संस्थात्मक विलगीकरण या गोष्टी पाळल्या गेल्याच पाहिजेत. बाहेरून येऊन कोणामार्फत संसर्ग पसरणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. बाहेरून येणाऱ्या बाधित व्यक्तींमध्ये अनेकदा ‘कोरोना’ची लक्षणे दिसत नाहीत. परंतु त्यांच्या मार्फत संसर्ग पसरण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांच्याबाबत काटेकोर कार्यवाही व्हावी. आवश्यक तिथे इतर यंत्रणांचे सहकार्य घ्यावे, अशा सूचनाही श्री.पवार यांनी केल्या.