अंतिम वर्षाच्या परीक्षेचा प्रश्न तातडीने निकाली काढा,; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबतचा प्रश्न विनाविलंब सोडविण्याची सुचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. शिवाय, अंतिम वर्षाच्या परीक्षाही रद्द करण्याच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या भूमिकेवरही राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अलीकडेच विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवून अंतिम वर्षांच्या शेवटच्या सत्रातील परीक्षा रद्द करण्याची परवानगी मागितली होती. मंत्री सामंत यांच्या भूमिकेवर राज्यपालांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सामंत यांनी परिक्षा रद्द करण्याबाबत युजीसीला पाठविलेले पत्र म्हणजे अनावश्यक हस्तक्षेप करण्याचा प्रकार आहे. याबाबत मंत्री सामंत यांना योग्य ती समज देण्याची सूचनाही राज्यपालांनी केली आहे. परिक्षा न घेण्याची भूमिका ही युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचा भंग आहे. शिवाय, महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील तरतुदींच्या विरोधात मंत्र्यांनी भूमिका घेतली आहे. सामंत यांच्या यासंदर्भातील पत्रव्यवहाराबाबत राज्यपालांनी आपली नाराजीही व्यक्त केली. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पदवी प्रदान करणे योग्य होणार नाही असे मतही राज्यपालांनी व्यक्त केले. भविष्यात या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण आणि रोजगारावर अशा निर्णयाचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. मुलांचे भविष्यच धोक्यात येण्याची शक्यता राज्यपालांनी यानिमित्ताने वर्तविली आहे.

राज्य शिक्षण मडळ, सीबीएसई, आयसीएसई अशा सर्व शिक्षण मंडळांना सहावी, बारावीच्या परीक्षांसाठी गृहविभागाने लॉकडाउमधून सुट दिली होती. शिवाय, परीक्षा, शैक्षणिक वर्षाबाबत युजीसीने यापूर्वीच सर्व विद्यापीठांना मार्गदर्शक सूचना दिल्याची आठवणही राज्यपालांनी या पत्राद्वारे करून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *