महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १ मार्च । एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी धाराशिव येथील कळंब आगाराचा एक कर्मचारी गळ्यात फास अडकवून टॉवरवर चढला आहे. आज अधिनेशनात काय तो न्याय द्या, अन्यथा मी आत्मदहन करणार, असा इशारा या कर्मचाऱ्याने दिला आहे.
सच्चिदानंद पुरी असे या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. मी एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकलो नाही. म्हणून मी आज हे पाऊल उचलले आहे. माझ्या जिवाचे काही बरे वाइट झाले तर मला कोणीही श्रद्धांजली अर्पण करू नये, अशी भूमिका त्याने घेतली आहे.
गेल्यावर्षी एसटी महामंडळ शासनात विलीन करावे या मागणीसाठी राज्यभर संप पुकारण्यात आला होता. त्या दरम्यान देखील हा कर्मचारी अशाचप्रकारे गळ्यात फास अडकवून झाडावर चढला होता. आता विलीनीकरणाचा प्रश्न कोर्टात आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी सच्चिदानंद पुरी कळंब शहरातील 100 फुट उंच बीएसएनएलच्या टॉवरवर चढला आहे.
धुर्त राजकारणी आणि कर्मचारी संघटनांमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे नुक्सान होत आहे, असे कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे. सच्चिदानंद पुरी हे कर्मचारी बीएसएनएलच्या टॉवरवर चढले आहेत. आपण आत्मकलेश करत असल्याची पोस्टही त्यांनी लिहिली आहे.