महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०१ मार्च । हवामान खात्याने उष्णतेबाबत मोठे संकेत दिले आहेत. फेब्रुवारीमध्ये या उष्णतेने 122 वर्षांचा विक्रम मोडला असून फेब्रुवारी 2023 सर्वात उष्ण महिना ठरला आहे. त्यामुळे पुढील तीन महिने नागरिकांसाठी हा उकाडा असह्य ठरणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
फेब्रुवारी महिन्यायातील उष्णतेने 122 वर्षांचा विक्रम मोडला आहे. यादरम्यान दिवसाचे सरासरी तापमान 1.73 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. याआधी 1901 फेब्रुवारीमध्ये सरासरी तापमान 0.81 अंश सेल्सिअस जास्त असताना अशा तापमानाची नोंद झाली होती. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, येत्या तीन महिन्यांत उष्णता नागरिकांना असह्य होऊ शकते. 1 मार्चपासून हवामान खात्याने संपूर्ण देशासाठी उष्णतेबाबत इशारा दिला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, देशातील अनेक भागात तापमान मागील वर्षांच्या तुलनेत जास्त असेल आणि उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. हवामान तज्ज्ञांचे म्हणण्यानुसार ईशान्य, पूर्व आणि मध्य हिंदुस्थानाबरोबर उत्तर-पश्चिम भागातील तापमान मार्चपासून सरासरीच्या तुलनेत वाढेल. अहवालानुसार, येत्या 3 महिन्यांत दिवसा कडक उष्मा असेल. रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात कडाक्याच्या उन्हाची शक्यता आहे. तर गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये उष्णतेची लाट आणि रात्रीचे तापमान जास्त राहील.
येत्या तीन महिन्यांत हिंदुस्थानात उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत होणार आहे. उष्णतेच्या लाटेचा परिणाम देशातील अनेक भागांमध्ये दिसणार आहे. विशेष करुन दक्षिण हिंदुस्थान, मध्य हिंदुस्थानातील काही भाग, पश्चिम हिंदुस्थान आणि उत्तर हिंदुस्थान. याशिवाय मार्चमध्ये देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा खूप जास्त राहण्याची शक्यता आहे.