महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०१ मार्च । इंदूर येथे बॉर्डर-गावस्कर चषकासाठी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताचा डाव अवघ्या 109 धावांवर आटोपला आहे. ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंसमोर भारतीय फलंदाजांनी लोटांगण घातल्याने टीम इंडियावर ही नामुष्की ओढवली आहे.
या सामन्यात टीम इंडिया ने नाणेफेक जिंकत पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय भारतीय संघासाठी महागात पडला. कारण सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या 1 तासात यजमान संघाचे 5 बळी बाद झाले. अवघ्या 45 धावांमध्ये संघाने 5 विकेट गमावल्या. ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंनी सुरेख गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना जखडून ठेवलं होतं. मायदेशातील पिचवर फलंदाज बॉलचा टप्पा कुठे पडेल आणि कसा वळेल हे हेरण्यात फेल ठरल्याचे दिसून आलं आहे.
संघाला पहिला धक्का हा 5.6 व्या षटकांत बसला. धावसंख्या 27 असताना रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर घसरगुंडीच उडाली. ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू कुन्हेनमन याने 5 बळी टिपले तर नाथन लायन याने 3 बळी टिपले. टॉड मर्फी यानेही एक बळी टिपला. भारताकडून कडून फलंदाजीत विराट कोहली याने या सामन्यात सर्वात जास्त म्हणजे 22 धावा केल्या. त्याखालोखाल शुभमन गिल याने 21, एस. भरत आणि उमेश यादव या दोघांनी प्रत्येकी 17 धावा केल्या.
चार सामन्यांच्या मालिकेत यजमान संघाने पहिल्या दोन्ही कसोटींमध्ये पाहुण्या संघाला अडीच दिवसांतच पराभूत केले होते. तिसरी कसोटी जिंकल्यास टीम इंडिया चौथ्यांदा बॉर्डर-गावसकर करंडकावर आपले नाव कोरणार आहे. याचबरोबर कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे फायनलचे तिकीटही बुक करू शकेल. त्यामुळे भारतीयांसाठी या कसोटीतील विजय अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.