महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०२ मार्च । संपूर्ण राज्याचं लक्ष लागेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार हेमंत रासने यांना पराभवाचा धक्का देत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी मैदान मारलं आहे. भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कसबा मतदारसंघात धंगेकर यांनी जवळपास ११ हजार मतांनी विजय मिळवला. ज्या मतदारसंघात भाजपने तब्बल २८ वर्ष वर्चस्व गाजवलं त्याच मतदारसंघात विजयी झेंडा फडकवण्यात यशस्वी ठरलेल्या धंगेकर यांच्या विजयाने काँग्रेससह महाविकास आघाडीच्या गोटात चैतन्य परसलं आहे. भाजपचे अनेक दिग्गज नेते मैदानात असताना आणि दुसरीकडे स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली संपूर्ण ताकद झोकून दिल्यानंतरही रविंद्र धंगेकर यांनी ही किमया नेमकी कशी साधली, याबाबत आता राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.
पुणे महापालिकेत तब्बल ५ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या रविंद्र धंगेकर यांचा जनसंपर्क कमालीचा आहे. अगदी रात्री १२ वाजताही एखाद्या नागरिकाने मदतीसाठी फोन केला तर धंगेकर यांच्याकडून त्याला प्रतिसाद दिला जातो, अशी त्यांची मतदारसंघात ख्याती आहे. तसंच इतक्या वर्ष नगरसेवक म्हणून काम करूनही चारचाकी गाडीचा वापर न करता ते दुचाकीनेच मतदारसंघात फिरणं पसंत करतात. त्यामुळे नागरिकांचे नेमके काय प्रश्न आहेत, हे जाणून घेत त्याची सोडवणूक करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या धंगेकर यांची लोकांची असलेली नाळ अधिकच घट्ट झाली. अगदी महापालिकेत असलेल्या हेल्पलाइन नंबरवर फोन करून लोकांनी सांगितेल्या अडचणीही धंगेकर यांच्यापर्यंत पोहचायच्या आणि त्या सोडवण्यासाठी ते धाव घ्यायचे.