अवकाळी पावसाने अनेक जिल्ह्यांत पिके आडवी; रब्बी पिके आणि बागायतीलाही फटका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०८ मार्च । गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. ऐन तोडणीवर आलेल्या पिकांसह भाजीपाल्याचेही या पावसाने नुकसान केले आहे. घसरलेल्या कांदादरामुळे बेजार झालेला शेतकरीराजा आता अवकाळीच्या तडाख्याने चिंतातूर झाला आहे. दुसरीकडे रब्बी पिके व बागायतींचेही नुकसान झाले आहे.

उत्तर महाराष्ट्रात सोमवारी अवकाळी पाऊस कोसळला. यामुळे येवला, निफाड, सटाणा, बागलाणसह मनमाड, नांदगावात गहू, हरभरा, मका आणि कांदा पिकांना भुईसपाट केले. नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात तीन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसाने सुमारे आठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. द्राक्ष, कांदा, गहू, हरभरा, आंबा या प्रमुख पिकांसह इतर पिके तसेच भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यांत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला रब्बीचा हंगामच हिरावला जाण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी वृक्ष तसेच द्राक्षबागा आडव्या पडल्याची नोंद आहे.

नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांत हजार ६८५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाल्याची नोंद सोमवारी सायंकाळी पाचपर्यंत झाली होती. नाशिक तालुक्यात सुमारे ११७ हेक्टर, तर निफाड तालुक्यात ६६० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांच्या नुकसानाची नोंद झाली. हे दोन तालुके मिळून सुमारे ७७७ हेक्टर परिसरात द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. याशिवाय त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुमारे दोन हेक्टर परिसरात आंब्यांचे नुकसान झाले आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात गारपिटीने पिकांचे नुकसान झाले. पाठोपाठ मंगळवारी पहाटे अवकाळी पावसाने गहू, हरबऱ्यासह केळीच्या बागा भुईसपाट केल्या. वादळी वाऱ्यांमुळे आंब्याचा मोहर देखील गळून पडला. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे रब्बीची पिके अक्षरश: उद्ध्वस्त झाली. भुसावळ, रावेर, यावल, चोपडा तालुक्यासह परिसरात वादळी वाऱ्यासह बरसलेल्या वादळी वाऱ्याच्या सरींनी गहू व हरबऱ्याची पिके आडवी पडली. रावेर, मुक्ताईनगरातील केळीच्या बागांनाही अवकाळीचा फटका बसला.

दुसरीकडे मराठवाड्यात रविवारी मध्यरात्री तसेच सोमवारी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे रब्बी पिके व फळबागांचे नुकसान झाले. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळल्या. पावसाचा फळबागांवरही परिणाम झाला असून, आंब्याचा मोहर गळला असून, मोसंबी, डाळींब बागांचेही नुकसान झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश दिले. नाशिक, जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशीम, ठाणे, पालघर, छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यांत वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *