![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०८ मार्च । गेल्या दोन दिवसांपासून तापलेल्या शहरावर काळ्याभोर ढगांनी गर्दी केल्याने पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे कमाल तापमानात 5 ते 6 अंशांनी घट झाली. उन्हाळ्यात पावसाळी वातावरण तयार झाले. 24 तासांत शहरात 1 मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, आगामी दोन दिवस शहराला यलो अलर्ट देण्यात आला असून, 9 मार्चपर्यंत वादळी वार्यासह पावसाचा अंदाज आहे.
हिमालयात तयार झालेल्या चक्रवातामुळे उत्तर भारताकडून शहराकडे गार वारे वेगाने दाखल झाले. काळ्याभोर ढगांनी आकाश झाकोळून गेल्याने सोमवारी होळीच्या दिवशी रात्री 7 च्या सुमारास हलका पाऊस शहरातील सर्वच भागांत झाला. त्यामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. मंगळवारी दुपारी 4 च्या सुमारास पुन्हा आभाळ काळ्याभोर ढगांनी भरून आले आणि 4.30 वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे पंधरा मिनिटांत पावसाने रस्ते चिंब भिजले. वातावरणात गारवा निर्माण झाला. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी शहरात 1 मिमी पावसाची नोंद झाली.
पावसाचा इशारा…
शहरात चोवीस तासांत केवळ 1 मिमी पावसाची नोंद झाली असली, तरीही तापमानात 5 ते 6 अंशांनी घट झाली आहे. दरम्यान, 8 व 9 रोजीही शहरात वारा अन् विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गार वार्यांनी तापमानात 5 ते 6 अंशांनी घट
दोन दिवसांच्या पावसाने वातावरण बदलले
चोवीस तासांत 1 मिमी पावसाची नोंद
नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले