हवामान विभागाने वर्तविला अंदाज ; ९ मार्चपर्यंत हलक्या पावसाबरोबर विजांचा कडकडाट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .८ मार्च । दरवर्षी सातत्याने अवकाळी व अवेळी पाऊस हा शेतकऱ्यांची चिंता वाढवत असतो. याही वर्षी तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बहरलेल्या आंब्याच्या बागा, तोडणीला आलेले संत्र्यांचे मळे, कापणीला आलेला गहू व हरभरा यावर संकटाचे ढग फिरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याची झोप उडाली आहे. ७ मार्च च्या मध्यरात्री वादळी वाऱ्याने घातलेल्या धुमाकळामुळे शेतीला मोठा फटका बसला.

प्रादेशिक हवामान केंद्र ( मुंबई ) च्या माहितीनुसार ७ ते ९ मार्च असे तीन दिवस हवामान ढगाळ राहून मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत हलकासा पाऊस पडेल. दरम्यान विजांचा कडकडाट होईल, असा अंदाज परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे.

सात मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलकासा पाऊस होऊन काही ठिकाणी वादळीवारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट होईल. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहील. ८ मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर व बीड जिल्ह्यांत तुरळक भागात वादळीवारा, मेघगर्जना व विजांचा कडकडाट होऊन शकतो. ९ मार्च रोजी बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, होऊन विजांचा कडकडाट होईल.

गेल्या चार दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सर्वत्र सकाळच्या वेळी थंड वातावरण राहत आहे. तर दुपारच्या वेळी उन तापू लागले आहे. ७, ८ व ९ मार्च रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट होईल. दरम्यान शेतकऱ्यांनी शेतात कामे सुरू ठेवली असतील तर त्यांनी अशावेळी कामे आटोपती घ्यावीत. पावसात शेतीकामे करू नये. घरी जाते वेळेस झाडाखाली किंवा पत्राच्या खोलीत थांबू नये. पशुधनालाही पत्राच्या खोलीत बांधू नये. स्वतःची व पशुधनाची काळजी घ्यावी,असे आवाहन ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *