सावधान… ‘पॅनकार्ड’ करतेय बँक खाती रिकामी, तुम्हालाही येऊ शकतो असा मेसेज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ मार्च । मार्च महिना आला की, प्राप्तिकर, पॅनकार्ड, आर्थिक तजवीज हे विषय चर्चेला येतात. हाच धागा पकडत सायबर चोरांनी पुन्हा एकदा फसवणुकीसाठी पॅनकार्डचा वापर सुरू केला आहे. बँक खात्याशी पॅनकार्ड लिंक नसल्याचे सांगून ते अपडेट न केल्यास बँक खाते बंद होईल, असे भासविले जाते. ऑनलाइन अपडेट करण्यास सांगून लिंक, ॲपच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक केली जात आहे. मुंबईत आठवडाभरात पॅनकार्ड फसवणुकीचे दोन डझनहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनीदेखील सायबर चोरांच्या या गुन्हेपद्धतीची दखल घेत सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गोरेगाव पूर्वेकडील ओबेरॉय वुड्स येथे राहणाऱ्या ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइलवर एक संदेश आला. बँक खात्यासोबत तुमचे पॅनकार्ड अपडेट नसल्याने तुमचे नेट बँकिंग ब्लॉक करण्यात येत आहे, असे नमूद करताना सोबत एक लिंकदेखील पाठविण्यात आली होती. या लिंकवर जाऊन पॅनकार्ड आणि बँक खात्याचा तपशील भरल्यास ऑनलाइन घरबसल्या अपडेट करता येते, असेही या संदेशात म्हटले होते. त्यानुसार वृद्धाने लिंकवर जाऊन आपल्या तिन्ही बँक खात्यांना पॅनकार्ड जोडण्यास सुरुवात केली. पहिल्याच खात्याला जोडत असताना ९९ हजार ९९८ रुपये वजा झाले. इतर दोन खात्यांना पॅनकार्ड जोडत असताना आणखी तीन लाख रुपये वजा झाले. याबाबत आरे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा संदेश टाळा
प्रिय ग्राहक, तुमचे बँक खाते क्रमांक काही वेळातच बंद करण्यात येणार आहे. आपल्या खात्याला पॅनकार्ड लिंक केलेले नाही. खाते बंद होणे टाळण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि घरबसल्या अपडेट करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *