रिक्षा चालक, मालक आणि अंगणवाडी सेविकांना मदतीसाठी आमदार अण्णा बनसोडे सरसावले

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । पिंपरी । विशेष प्रतिनिधी । कोरोनाचा साथीमुळे झालेली टाळेबंदीची स्थिती यातून निर्माण झालेल्या बेरोजगारी व उपासमारी परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या रिक्षाचालकांना मदतीचा हात द्यावा म्हणून आमदार बनसोडे यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे शहरातील रिक्षाचालकाना ५००० रुपये सहायता अनुदान देण्याबाबत मागणी केली होती. परंतू मनपा प्रशासन आणि मनपा सत्ताधार्यांच्या नाकर्तेपणामुळे मनपा प्रशासनाकडून कसलीच मदत झाली नाही. मात्र मनपा प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता बनसोडे यांनी स्वयंस्फूर्तीने नागरिकांना मदत करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. रिक्षाचालकच नव्हे तर तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना सुध्दा स्वखर्चातून मदत करण्याच्यादृष्टीने त्यांनी सुरुवात केली आहे.

तसेच शहरातील ७००० गरजू रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात येणार असून, आजपर्यंत ६७९ रिक्षाचालकांना सोशल डिस्टन्सिंग ठेऊन या कीटचे वाटप पूर्ण झाले असून, उर्वरितांचे वाटप जलद गतीने करणे सुरु आहे. त्याच बरोबर कार्यकर्त्यांमार्फत सुमारे १०३ अंगणवाडी सेविकांना घरपोच या जिवनावश्यक वस्तू पोहचविण्यात आल्याची माहिती बनसोडे यांनी दिली आहे. एकूणच मनपा प्रशासन जरी गोरगरीब जनतेसाठी उपयोगी पडत नसले तरी, बनसोडे यांनी मात्र गरिबांना मदतीचा हात दिला आहे. कोरोनाच्या साथीचा शहरात शिरकाव झाल्यापासून आमदार बनसोडे हे नागरिकांच्या संपर्कात असून चिंचवड स्टेशन येथील त्यांच्या कार्यालयातून ते कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. रमजान ईद साजरा होत असताना गरजू गरीब मुस्लीम बांधवांनाही त्यांनी मदत केली आहे. बनसोडे यांचा मतदारसंघात शहरातील सर्वाधिक झोपडपट्टी असून हातावर पोट असणारा घटक त्यांच्या मतदारसंघात वास्तव्य करीत आहे.

‘हाताला काम नाही आणि खायला अन्न नाही’ अशी स्थिती अनेक नागरिकांची झालेली आहे. काही दिवसांपूर्वी आनंदनगर भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने निर्माण झालेली परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर जात असताना आयुक्तांसोबत थेट आनंदनगर भागात जाऊन नागरिकांना घराबाहेर पडून नका म्हणून आवाहन त्यांनी केले होते. बनसोडे हे मनपा प्रशासनाच्या सतत संपर्कात असून प्रशासनाला केवळ सूचना न देता प्रत्यक्ष काम करत असल्याचेही दिसून येत आहे. मी दिलेल्या सूचनाबाबत प्रशासनाने सहकार्य करावे असे ही त्यांनी म्हटले आहे. मनपा प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता जमेल तेवढी जमेल तशी मदत सामान्य जनतेस करण्यासाठीची त्यांची धडपड दिसून येते हे मात्र कौतुकास्पद आहे. मिळालेल्या मदतीने भारावून गेलेला रिक्षाचालक आणि अंगणवाडी सेविकांनी मात्र अण्णांचे मनापासून आभार मानले आहेत. सामान्य रिक्षाचालक हक्काचा माणूस म्हणून अण्णांकडे येऊन मदत घेऊन जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.


प्रतिक्रिया…
सध्या सुरु असलेल्या लॉक डाऊनच्या काळात वृत्तपत्र विक्रेत्यांचेही काम बंद आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात वृत्तपत्र विक्रेते आणि स्थानिक कलावंताना सुध्दा आवश्यक ती मदत करण्यात येणार आहे.
*-अण्णा बनसोडे, आमदार, पिंपरी विधानसभा*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *