महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० मार्च । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) त्यांचे चुलत बंधू आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टोला लगावला आहे. मनसेचा 17 वा वर्धापन दिन आज ठाण्यामध्ये साजरा करण्यात आला. येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये आयोजित वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या नव्या वेबसाईटचं अनावरण करण्यात आलं. या वेबसाईटवर 17 वर्षांमध्ये पक्षाने काय काय काम केलं आहे यासंदर्भातील पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. याच पुस्तिकेसंदर्भात बोलताना पक्षाच्या कामांचा आढवा घेताना राज यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनाचा संदर्भ देत उद्धव यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
हिंदुत्व मानता म्हणजे नेमकं काय करता?
मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आंदोलन केलं. पाकिस्तानी कलाकारांना 48 तासांमध्ये हुसकवून लावलं, असा उल्लेख मनसेच्या या पुस्तिकेमध्ये असल्याचा संदर्भ राज यांनी भाषणामध्ये दिला. “हे काम आपण केलं. सो कॉल्ड जे स्वत:ला हिंदुत्ववादी पक्ष म्हणतात ते कुठे होते? काय करत होते? चिंतन!” असं म्हणत राज यांनी हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरुन राजकारण करणाऱ्या पक्षांवर टीका केली. तसेच पुढे बोलताना राज यांनी, “या सगळ्या गोष्टींची आंदोलन आपण घेतली. मशिदींवरील भोंगे, पाकिस्तानी कलाकारांना हाकलवून देणं असो. पण आपण हे सगळं सांगतो तेव्हा ते म्हणतात, आम्ही हिंदुत्वाला मानतो. पण म्हणजे नेमकं काय करता? तुमचं हिंदुत्व म्हणजे नेमकं काय असतं? नुसती जपमाळ? प्रत्यक्ष कृतीमध्ये तर हे कधी दिसत नाहीत,” असा टोला लगावला.
रद्द झालेल्या अयोध्या दौऱ्यावरुन हिंदुत्ववादी पक्षांना टोला
रद्द झालेल्या अयोध्या दौऱ्याचा संदर्भही राज यांनी आपल्या भाषणात दिला. “त्या भोंग्यांच्या प्रकरणानंतर मला अयोध्येला बोलवलं तिकडे. विरोध करणारे कोण हिंदुत्वावादीच. मला आतलं राजकारण समजलं होतं. म्हणून मी त्यावेळेला सांगितलं की आता नको, तुर्त नको. यांना जे करायचं आहे ते करु दे. पण ज्यांनी हे केलं त्यांचं पुढे काय झालं?” असं राज यांनी हसून उपस्थितांना विचारलं. यावर गर्दीमधून ‘सत्ता गेली’ असं उत्तर आलं. “हे असं असतं. म्हणून आपल्या वाटेला जायचं नाही कोणी”, असं राज म्हणाले. पुढे बोलताना राज यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव यांना टोला लगावला.
उद्धव यांना टोला…
भोंग्यांविरोधी आंदोलनामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल झाल्याचा संदर्भ राज यांनी दिला. आपल्या वाटेला गेल्याने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरुन जावं लागलं असं सूचक विधान राज यांनी केलं. “हे भोंग्यांविरोधात आंदोलन झालं तेव्हा महाराष्ट्रभर माझ्या 17 हजार महाराष्ट्र सैनिकांविरोधात केसेस टाकल्या गेल्या. बोललो ना वाटेला जायचं नाही. मुख्यमंत्री पदावरुन जावं लागलं. असो हे सगळे 22 मार्चचे विषय आहेत,” असं राज यांनी म्हटलं आणि ते पुढच्या मुद्द्याकडे वळाले.