महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ मार्च । कोव्हिड विषाणू संसर्गाच्या महासाथीवर नियंत्रण मिळवून सुटकेचा निःश्वास टाकला, त्याला काही महिने उलटतात न उलटतात तोच देशात सध्या ‘एच3एन2’ या विषाणूमुळे होणार्या संसर्गाची प्रकरणे वाढताना दिसताहेत. दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत या विषाणूमुळे संसर्ग होण्याची लाखो प्रकरणे सर्रास घडतात. पण यंदा मात्र नेहमीपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. एच3एन2 विषाणूंमध्ये अधिक अनुवांशिक बदल होताना दिसून येत आहेत.
विषाणू हा शब्द आणि ही संकल्पना कोव्हिडनंतर घरोघरी पोहोचली आहे. लहान मुलांपासून ते 80-90 वर्षांच्या वयोवृद्धालाही विषाणू आणि व्हायरस या संकल्पना आता चांगल्या माहीत झाल्या आहेत आणि समजल्याही असतील. कोव्हिडच्या सुरुवातीच्या काही दिवसांत सर्वसामान्य लोकांचा एक समज होता की, या जगात एकच विषाणू किंवा व्हायरस आहे आणि तो म्हणजे कोरोना व्हायरस. पण तेव्हापासून अनेक संशोधक सांगत होते की, पृथ्वीतलावर हजारो विषाणू रहिवास करत आहेत आणि त्यांचा फक्त मानवी जीवनावरच नाही तर सर्वच प्राणिमात्रांवर परिणाम होतो. या हजारोंमधीलच एक कोरोना व्हायरस आहे आणि त्याच्या जोडीला आणखी एक विषाणू असून तोच सध्या भारतात वरचढ होताना दिसून येत आहे. हा विषाणू म्हणजे ‘इन्फ्लूएंझा’.
इन्फ्लूएंझा म्हणजे नक्की काय?
फ्लू म्हणजेच (इन्फ्लूएंझा) हा नाक, घसा आणि फुफ्फुसांचा संसर्ग आहे. हे अवयव आपल्या श्वसन प्रणालीचे भाग आहेत. इन्फ्लूएंझाला सामान्यतः फ्लू म्हणतात, परंतु ते पोटातील फ्लू विषाणूंसारखे नाहीत, ज्यामुळे अतिसार आणि उलट्या होतात. बर्याच तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, फ्लूचे विषाणू मुख्यत्वे फ्लूग्रस्त व्यक्तीकडून खोकताना, शिंकताना किंवा बोलत असताना तयार केलेल्या लहान थेंबांद्वारे पसरतात. हे थेंब जवळच्या लोकांच्या तोंडात किंवा नाकात येऊ शकतात. कमी वेळा एखाद्या व्यक्तीला फ्लूचा विषाणू असलेल्या पृष्ठभागाला किंवा वस्तूला स्पर्श केल्याने आणि नंतर स्वतःच्या तोंडाला, नाकाला किंवा शक्यतो त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केल्यास फ्लू होऊ शकतो. इन्फ्लूएंझा व्हायरसचे चार प्रकार आहेत. त्यांना इन्फ्लूएंझा ए, बी, सी आणि डी यामध्ये वर्गीकृत केले आहेत. जलचर पक्षी हे इन्फ्लूएंझा ए व्हायरसचे (आयएव्ही) प्राथमिक स्रोत आहेत, जे मानव आणि डुकरांसह विविध सस्तन प्राण्यांमध्ये देखील व्यापत आहेत. इन्फ्लूएंझा बी व्हायरस (आयबीव्ही) आणि इन्फ्लूएंझा सी व्हायरस (आयसीव्ही) प्रामुख्याने मानवांना संक्रमित करतात आणि इन्फ्लूएंझा डी विषाणू (आयडीव्ही) गुरे आणि डुकरांमध्ये आढळतात. आयएव्ही आणि आयबीव्ही मानवांमध्ये प्रसारित होतात आणि हंगामी साथीच्या रोगांना कारणीभूत ठरतात आणि आयसीव्हीमुळे प्रामुख्याने लहान मुलांमध्ये संसर्ग होतो. आयडीव्ही मानवांना संक्रमित करू शकते; परंतु आजार झाल्याचे ज्ञात नाही. मानवांमध्ये, इन्फ्लूएंझा विषाणू प्रामुख्याने खोकणे आणि शिंकणे यातून निर्माण होणार्या श्वसनाच्या थेंबांद्वारे प्रसारित केले जातात. हवा आणि पाणी यांचे छोटे थेंब म्हणजेच एरोसॉल्स तसेच व्हायरसने दूषित पृष्ठभागाद्वारे संक्रमण देखील होते.
‘एच3एन2’ हा विषाणूचा काय प्रकार आहे?
एच3एन2व्ही हा एक गैरमानवी इन्फ्लूएंझा विषाणू आहे, जो सामान्यतः डुकरांमध्ये अधिवासात असतो आणि ज्याचा मानवांना लगेचच संसर्ग होतो. तो इन्फ्लूएंझा ए व्हायरस (आयएव्ही) या प्रकारात मोडतो. सामान्यतः डुकरांमध्ये फिरणारे विषाणू स्वाईन इन्फ्लूएंझा व्हायरस असतात. जेव्हा हे विषाणू मानवांना संक्रमित करतात तेव्हा त्यांना विविध म्हणजेच व्हेरियंट असे म्हटले जाते. सन 2011 मध्ये, एक विशिष्ट एच3एन2 विषाणू एव्हियन, स्वाईन आणि मानवी विषाणूंच्या जनुकांसह आणि 2009 च्या एच1एन1 साथीचा विषाणू एम जीनसह आढळला होता. 2010 मध्ये हा विषाणू डुकरांमध्ये फिरत होता आणि 2011 मध्ये पहिल्यांदा मानवी समूहात आढळून आला होता. 2009 एम जीनच्या संपादनामुळे हा विषाणू इतर स्वाइन इन्फ्लूएंझा विषाणूंपेक्षा अधिक सहजपणे मानवांना संक्रमित करू शकतो. आतापर्यंत या विषाणूंवर आणि त्याच्या संसर्गावर झालेल्या संशोधनानुसार एच3एन2 इन्फ्लूएंझा हा विषाणू अत्यंत संसर्गजन्य असून एखाद्या संक्रमित व्यक्तीद्वारे खोकताना, शिंकताना किंवा बोलत असताना सोडलेल्या थेंबांद्वारे एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीमध्ये प्रसारित केला जाऊ शकतो. व्हायरस असलेल्या पृष्ठभागाशी संपर्क साधल्यानंतर कोणीतरी त्यांच्या तोंडाला किंवा नाकाला स्पर्श केल्यास देखील संसर्ग पसरू शकतो. या विषाणूमुळे झालेला संसर्ग हा गर्भवती महिला, लहान मुले, वृद्ध प्रौढ आणि अंतर्निहित वैद्यकीय समस्या असलेल्या व्यक्तींना फ्लूशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो.
काळजी काय घ्यावी?
या विषाणूचा संसर्ग झाल्यावर पुढच्या चार दिवसात सतत खोकला आणि कधी कधी त्याच्या जोडीला ताप ही येणे ही लक्षणे दिसून येतात. सध्या फ्लूच्या इतर उपप्रकारांपेक्षा मएच3एन2फमुळे रुग्णांनी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. सर्दी, खोकला आणि तापाबरोबरच मळमळ, उलट्या, घसादुखी, अंगदुखी, अतिसार ही या आजाराची अन्य लक्षणे दिसून येत आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या निवेदनात या विषाणूच्या संसर्गामध्ये ताप आल्यास हायड्रेटिंग आणि पॅरासिटामॉलचे सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यात असेही नमूद केले आहे की लोकांनी प्रतिजैविकांचे सेवन करू नये कारण ते एच3एन2 विरुद्ध कार्य करत नाहीत; उलट प्रतिजैविके प्रतिरोधक शक्ती निर्माण करतात आणि आवश्यकतेनुसार कार्य करणार नाहीत. अँटीबायोटिक्स म्हणजेच प्रतिजैविक फक्त डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच घेतली जातात आणि रुग्णांनी किंवा त्याच्या नातेवाईकांनी या औषधांची शिफारस डॉक्टरांकडे करू नये. बहुतेक वेळा लोक अॅझिथ—ोमायसिन आणि अमोक्सिक्लॅव्ह इत्यादी प्रतिजैविके घेणे सुरू करतात, तेही डोस आणि वारंवारितेची पर्वा न करता आणि बरे वाटू लागल्यावर ते थांबवतात. हे थांबवण्याची गरज आहे; कारण यामुळे प्रतिजैविकांचा प्रतिकार होतो आहे आणि आपण नवीनच आजाराला किंवा संसर्गाला निमंत्रण देतो आहोत. भारत सरकारच्या 15 डिसेंबर 2022 पासून केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे कि या विषाणूचा प्रादुर्भाव मुख्यत: हवेतून होत आहे. तसेच 15 पेक्षा कमी आणि 50हून अधिक वयाच्या रुग्णांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत आहे. कदाचित 50 वर्षावरील लोकांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यामुळे त्यांना या विषाणूच्या संसर्गाचा धोका अधिक दिसून येत आहे.