महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ मार्च । हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई (Mumbai) आणि नजीकच्या परिसरामध्ये उन्हाच्या झळांनी हाहाकार माजवण्यास सुरुवात केली आहे. फेब्रुवारीपेक्षाही कडक उन्हाळ्यामुळं शहरातील नागरिक हैराण आहेत. अनेकांनीच (heat stroke) उष्माघातापासून वाचण्यासाठी काही उपाय योजण्यास सुरुवातही केली आहे. हवामान विभागाडून मिळालेल्या आकडेवारीनुसार रविवारी मुंबईत तापामानानं 39 अंश सेल्सिअस इतका आकडा गाठला होता. आतापर्यंतहा हा उच्चांकी आकडा असल्यामुळं अनेकांचीच झोप उडाली.
फक्त मुंबईच नव्हे, तर कोकण किनारपट्टी (Konkan) भागालाही उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. राज्याच्या विदर्भाकडील (Vidarbha) भागाविषयी सांगावं तर इथंही तापमान 40 अंशांपलीकडे पोहोचण्याच्या मार्गावर आहे. पण, मुंबईसारख्या शहरांमध्ये एकाएकी जाणवणारा उन्हाचा तडाखा पाहता येणारे दिवस नेमके किती भीषण असतील याचाच अंदाज लावला जात आहे.
पुढील 5 दिवसात वातावरण बिघडणार…
हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार येत्या काळात पुन्हा एकदा पश्चिमी झंझावात सक्रीय होण्याची चिन्हं आहेत. ज्यामुळं 14 मार्चपर्यंत हिनालयाच्या पश्चिम भागामध्ये पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय दक्षिण, मध्य आणि पूर्व भारतात 15 ते 17 मार्चपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
पश्चिमी झंझावातामुळं पश्चिमी हिमालय क्षेत्र वगळता पंजाब आणि राजस्थानमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसतील. याशिवाय गुजरातमध्ये 14 मार्चपर्यंत पावसाची हजेरी असेल. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढमधील काही भागांमध्ये 16 मार्चपर्यंत ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाची हजेरी असू शकेल. आयएमडीच्या इशाऱ्यानुसार तामिळनाडू, कर्नाटक, पूर्व गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये 17 मार्चपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रासह देशभरात वातावरणामध्ये होणारे बदल पाहता नागरिकांच्या आरोग्यावर याचे थेट परिणाम होताना दिसत आहेत. एकिकडे बहुतांश राज्यांमध्ये उष्माघाताचा धोका असतानाच दुसरीकडे खोकला, ताप आणि सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळं नव्या विषाणूचा संसर्ग पसरताना दिसत आहे. कोरोनामागोमागच H3N2 चा संसर्गही फोफावत असल्यामुळं आरोग्य यंत्रणा सध्या सतर्कतेची पावलं उचलताना दिसत आहे.